तिन्ही दलांच्या प्रमुखांचा अग्निपथ योजनेला विरोध होता: कॉंग्रेसचा दावा

नवी दिल्ली – कॉंग्रेसने लष्करी भरतीसाठीच्या अग्निपथ योजनेवरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांच्या तत्कालीन प्रमुखांनी त्या योजनेला विरोध दर्शवला होता. माजी लष्करप्रमुख एम.एम.नरवणे यांच्या पुस्तकात त्याबाबत उल्लेख आहे, असा दावाही कॉंग्रेसने केला.
लोकसभा निवडणुकीतील प्रचारावेळी मोदी सरकारला लक्ष्य करण्यासाठी कॉंग्रेसकडून अग्निपथ योजना या मुद्द्याचाही वापर केला जात आहे. ते सत्र कायम ठेवत पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सोमवारी सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करून सरकारला घेरले. अग्निपथ योजना राष्ट्रीय सुरक्षेशी आणि युवकांच्या भविष्याशी खेळ करणारी आहे. ती योजना येण्याआधी संरक्षण दलांमध्ये दरवर्षी ७५ हजार युवकांची भरती व्हायची.
आता ते प्रमाण एक-चतुर्थांश इतके झाले आहे. अग्निपथ योजनेंतर्गत युवकांना ६ महिने प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर त्यांना सीमांवर पाठवून चीन आणि पाकिस्तानशी मुकाबला करण्यास सांगितले जाईल. मोदींनी कुणाशीही विचारविनिमय न करता ती योजना आणली. संरक्षण दलांनीही त्याविषयी सहमती दर्शवली नव्हती. त्या धोरणाने चीनविरोधातील आपल्या क्षमतांशी तडजोड झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.
अग्निपथ योजना का आणली गेली याचे उत्तर मोदींना ४ जूननंतर (निवडणूक निकालाचा दिवस) द्यावे लागेल. आम्ही केंद्रात सत्तेत आल्यानंतर ती योजना रद्द करू, असेही रमेश यांनी म्हटले.





