ICC ODI World Cup 2023 : “विश्वकरंडक स्पर्धेतील पाकिस्तानचे…” ICC कडून सर्व अफवांना पूर्णविराम

दुबई – भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तानचे सर्व सामने भारतातच होणार आहेत, असे जाहीर करत आयसीसीने सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. या स्पर्धेत पाकिस्तानचे सामने बांगलादेशमध्ये होणार असल्याचे वृत्त पसरले होते.
एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांत भारतात खेळविण्यात येणार आहे. मात्र, भारतीय संघ पाकिस्तानात आशिया करंडक स्पर्धा खेळण्यासाठी आला नाही तर आम्हीसुद्धा त्यांच्या देशात एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा खेळायला भारतात जाणार नाही, अशी भूमिका पाकिस्तान क्रिकेट मंडळाने घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे सामने बांगलादेशमध्ये होणार असल्याची आवई उठली होती.
या सगळ्याबाबत पाकिस्तान मंडळ, बीसीसीआय, बांगलादेश मंडळ यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नसून आयसीसीदेखील हे सामने भारतातच होणार आहेत, अशीच भूमिका घेत होती. त्याबाबतच शुक्रवारी आयसीसीने या सगळ्याच चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
भारत व पाकिस्तान यांच्यात राजकीय वातावरण असल्याने तसेच सुरक्षेचा मुद्दा असल्याने भारतातील केंद्र सरकारने भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये जाऊन आशिया करंडक स्पर्धा खेळण्याची परवानगी दिलेली नाही व त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, अशी भूमिका बीसीसीआयने यापूर्वीच जाहीर केली होती व त्याला आयसीसीनेही दुजोरा दिला होता.





