Congress | Maharashtra Government – देशासह राज्यातील शेतकरी आणि सामान्य माणूस कंगाल होत निघालाय आणि सरकारचे सगळे दलाल मालामाल होत आहेत. या कारभाराने सामान्य माणसाच्या आयुष्याचा चिखल झाला आहे, असा आरोप करत काँग्रेसने महायुती सरकारविरुद्ध चिखलफेक आंदोलन केले. काँग्रेस कमिटीसमोर महायुतीच्या फलकावर चिखल फेकण्यात आला. जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. राज्यातील जनता समस्यांचा सामना करत असताना भाजपाप्रणित युती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. या महाभ्रष्ट, निष्क्रीय सरकारच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो आहेत, असे सांगत काँग्रेस नेत्यांनी हल्लाबोल केला. आमदार सावंत म्हणाले, शेतकऱ्यांची अडवणूक होते आहे. पोलिस भरती चिखलात रुतली आहे. सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत चालढकल होत आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. श्रीमंतांची पोर गोरगरिबांना गाड्याखाली चिरडून मारत आहेत. मुलींचे दिवसाढवळ्या खून पडत आहेत. जातीधर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग केली जात आहे. सरकारच्या या कारभारावर चिखल फेकून आम्ही निषेध व्यक्त करतो.