Parliament Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार सर्वपक्षीय बैठक; तृणमुल कॉंग्रेसने टाकला बहिष्कार !

Parliament Monsoon Session – पुढील सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारने २१ जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली असल्याचं सांगण्यात आलं आहे. विरोधी पक्ष नेते म्हणून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची पहिलीच वेळ असेल जेव्हा ते सर्व पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहतील.
तथापि तृणमुल कॉंग्रेसने या सर्व पक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, २१ जुलै हा दिवस पक्ष शहीद दिन म्हणून साजरा करत असल्याने पक्षाचे कोणतेही प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.
पश्चिम बंगाल मध्ये हा शहीद दिन १३ दिवंगत काँग्रेस कार्यकत्यांच्या स्मरणार्थ पाळला जातो, ज्यांना १९९३ मध्ये कोलकाता पोलिसांनी राज्य सचिवालयावर मोर्चा काढताना गोळ्या घालून ठार मारले होते.
त्यावेळी त्या राज्यात सीपीआय(एम) च्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीचे सरकार सत्तेवर होते. ममता बॅनर्जी त्या वेळी राज्य युवक काँग्रेसच्या प्रमुख होत्या. त्यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून १ जानेवारी १९९८ रोजी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली होती तरीही त्या हा दिवस पाळत असतात.
संसदेचे पावसाळी अधिवेशन २२ जुलै रोजी सुरू होणार असून १२ ऑगस्ट रोजी संपणार आहे. २३ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.





