मोठी बातमी : गुजरातच्या 16 मंत्र्यांनी एकाचवेळी दिला राजीनामा; जाणून घ्या कारण

अहमदाबाद : गुजरातमध्ये मोठी राजकीय हालचाल घडली असून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याखेरीज सर्व 16 मंत्र्यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा शुक्रवारी दुपारी पार पडणार आहे, अशी माहिती राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.
सध्याच्या गुजरात मंत्रिमंडळात एकूण 17 मंत्री आहेत. त्यात मुख्यमंत्री पटेल यांच्यासह 8 जण कॅबिनेट मंत्री तर 8 जण राज्यमंत्री (MoS) पदावर आहेत. आगामी विस्तारात सुमारे 10 नवीन चेहरे मंत्रिमंडळात सामील होण्याची शक्यता असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. त्याचबरोबर जवळपास अर्धे मंत्री बदलले जाऊ शकतात, अशी माहितीही सूत्रांकडून समोर आली आहे.
अहवालानुसार, धर्मेंद्रसिंह, ऋषिकेश पटेल, मुकेश पटेल आणि भूपेंद्रसिंह चूडासमा हे आपले पद कायम राखण्याची शक्यता आहे. तर कनुभाई देसाई (अर्थ), रघवजी पटेल (कृषी), कुंवरजी बावळिया (पाणीपुरवठा) आणि मुरुभाई बेरा (पर्यटन) यांना मंत्रिमंडळातून वगळले जाऊ शकते.
शपथविधी सोहळ्याला केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत. सर्व भाजप आमदारांना गुरुवारीच गांधीनगरमध्ये पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गुजरात विधानसभा एकूण 182 सदस्यांची असून, घटनात्मक तरतुदीनुसार राज्यात कमाल 27 मंत्री (एकूण सदस्यसंख्येच्या 15%) असू शकतात.
अलिकडेच गुजरातचे राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांची भाजपच्या राज्याध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्यांनी केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांची जागा घेतली. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी 12 डिसेंबर 2022 रोजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.





