गुटखा तस्करी करणाऱ्याला आळेफाटा पोलिसांकडून अटक; 43 लाखांचा मुद्देमाल जप्त

आळेफाटा – आळेफाटा पोलिसांनी शनिवारी मोठी कारवाई करत तब्बल ४३ लाख ३६ हजार रुपयांचा गुटखा आणि ट्रक असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ट्रक चालकास अटक करण्यात आली असून, एक आरोपी फरार आहे.
नाशिकहून आळेफाट्याकडे गुटख्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती आळेफाटा पोलिसांना मिळाल्यानंतर पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा येथे नाकाबंदी लावण्यात आली होती. त्यावेळी (एम.एच.०४ एच.डी. ७३५०) क्रमांकाच्या आयशर ट्रकची तपासणी केली असता, त्यात विमल कंपनीच्या गुटख्याची ७५ पोती आढळून आली.
सदर गुटख्याची किंमत २८ लाख ३६ हजार ८०० रुपये असून, ट्रकसह एकूण मुद्देमालाची किंमत ४३ लाख ३६ हजार ८०० रुपये इतकी आहे. ट्रकचालक सादीक अब्दुलवहाब शेख (वय ४३, रा. चुनार गल्ली, चोपडा, जि. जळगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा एक साथीदार अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी रविंद्र चौधर आणि स्था.गु.शा. पुणे ग्रामीणचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विश्वास जाधव, उपनिरीक्षक सचिन पाटील, पोपट कोकाटे, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, पंडित थोरात, नवीन अरगडे, शैलेश वाघमारे, विष्णु दहिफळे, गणेश जगताप, ओंकार खुणे, संतोष साळुंके, भुजगराव सुकाळे तसेच पोलिस मित्र मंगेश कदम आणि सोमेश्वर भंडलकर यांनी केली.




