Manchar News | कोबीचे भाव पडल्याने शेतकरी हतबल ; उभ्या पिकात सोडल्या शेळ्या,मेंढ्या

प्रभात वृत्तसेवा
मंचर – कोबीच्या पिकाला बाजारात योग्य दर न मिळाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. सध्या दहा किलोसाठी केवळ ५० ते ८० रुपये भाव मिळत आहे. साधारण ६० ते ७० दिवसांत तयार होणाऱ्या या पिकासाठी एकरी अंदाजे ४० ते ५० हजार रुपये खर्च येतो. त्यात रोपे, औषधे, मजुरी यांचा समावेश आहे. फारसा भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कोबीच्या पिकातच शेळ्या,मेंढ्या सोडल्या आहेत.
मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून भाव कोसळल्याने कोबी उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतातच शेळ्या-मेंढ्या सोडून पिकाचे नुकसान टाळण्याचा मार्ग स्वीकारला आहे. १५ दिवसांपूर्वी १० किलोसाठी १०० रुपये बाजारभाव होता. बाजारभावात घसरण झाली आहे. शेतकऱ्यांना भाव मिळावा आणि तोटा भरून निघावा, अशी मागणी होत आहे.
“दररोज बाजारात कोबीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा होत आहे. ग्राहकांची मागणी कमी आहे आणि पिकाचे उत्पादन भरपूर आहे. त्यामुळे भाव खाली आले आहेत. विक्री करूनही आम्हा व्यापाऱ्यांना फारसा फायदा होत नाही.
– बाळासाहेब खिलारी,भाऊसाहेब पोखरकर-माडीवाले, कोबी व्यापारी, मंचर.
“कोबी पिकासाठी मोठा खर्च करूनही बाजारभाव पडले. दहा किलोला ५० ते ८० रुपये मिळाल्यास मजुरीदेखील निघत नाही. म्हणून काही शेतकऱ्र्यांनी पिकावर शेळ्या-मेंढ्या सोडल्या. सरकारने तरी आधार द्यावा, हीच अपेक्षा आहे.
– बी. टी. बांगर, शेतकरी, चांडोली.





