Alephata Crime: आळेफाट्यात हादरवणारी घटना! गळ्यावर मारली थाप अन् क्षणार्धात… महिलेसोबत काय घडलं?
Alephata Crime: आळेफाटा परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेल्या व्यक्तिचा आळेफाटा पोलिसांकडून शोध सुरू.

Alephata Crime – आळेफाटा परिसरात पायी घरी जाणार्या 48 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे 1 लाख 63 हजार 350 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात व्यक्तीने बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना 17 ऑगस्ट रोजी दुपारी घडली. या प्रकारामुळे परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित महिला उपचारासाठी आळेफाटा येथील एका आरोग्य केंद्रात गेल्या होत्या.
उपचार आटोपल्यानंतर त्या आळेफाटा एस.टी. स्थानकावरून पायी घरी जात होत्या. पिसे हॉस्पिटल परिसरातून सार्वी निसर्ग सोसायटीकडे जाणार्या रस्त्यावर दुपारी सुमारे 12.45 वाजता त्यांच्या पाठीमागून एक अनोळखी व्यक्ती आली. काही अंतर पुढे गेल्यानंतर संबंधित व्यक्ती अचानक मागे फिरली. त्याने महिलेच्या गळ्यावर जोरात थाप मारून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घेतले आणि घटनास्थळावरून पळ काढला.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने पिवळ्या रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली होती. त्याची उंची अंदाजे पाच फूट असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी संबंधित व्यक्तीचे नाव विनीत लोखंडे असल्याचे सांगितल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये काळ्या मण्यांचे सोन्याचे मंगळसूत्र असून त्याची किंमत 1 लाख 63 हजार 350 रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तिटमे पुढील तपास करीत आहेत.





