किंग्जस्टन (जमैका) – कुटुंबियांसमवेत जमैकाला सुटी घालवायला गेलेल्या ब्रिटनच्या एका व्यक्तीला कॉकटेल पिण्याचे एक चॅलेंज महागात पडले आहे. एका बैठकीमध्ये 21 कॉकटेल पिण्याचे चॅलेंज पूर्ण करण्याच्या प्रयत्नात या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. टिमोथी साऊदर्न असे या 53 वर्षीय व्यक्तीचे नाव असून बारमधील सर्व कॉकटेल एकाच बैठकीत पिऊन टाकण्याचे चॅलेंज त्यांनी स्विकारले होते.
ठरल्याप्रमाणे त्यांनी एकापाठोपाठ एक कॉकटेल पिण्यास प्रारंभ केला. मात्र 12 कॉकटेल प्यायल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. ते हॉटेलमधील खोलीमध्ये गेले आणि तेथे त्यांना उलट्या झाल्या. थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू झाला.
मद्याच्या अतिसेवनामुळे त्यांना “गॅस्ट्रोइंटेस्टायनिस’ झाल्याचे जमैकातील पॅथोलॉजिस्टनी सांगितले. जमैकातील टॉक्सिकोलॉजी तपासणीचा अहवाल येण्यास 3 वर्षे लागणार आहेत.
साऊदर्न हे आपली बहिण, मुले आणि अन्य नातेवाईकांसमवेत जमैकाला मे महिन्यात सुटी घालवण्यासाठी गेले होते. तेथे त्यांना कॅनडाच्या दोन महिला कॉकटेल पिण्याचे चॅलेंज स्विकारताना आढळल्या. म्हणून त्यांनीही असे चॅलेंज स्विकारले होते.