गुजरातमध्ये मिळणार दारू ! दारूबंदीच्या लिस्टमधून ‘या’ ठिकाणाला वगळले

नवी दिल्ली – गांधीनगरमधील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (गिफ्ट सिटी) क्षेत्रासाठी मद्य बंदी उठवण्यात आली आहे. मद्यसेवा देऊ इच्छिणाऱ्या हॉटेल्स , क्लब, आणि रेस्टॉरंट्ससाठी एक नियमावलीही सरकारने जारी केली आहे. यामुळे आता गिफ्ट सिटीमध्ये मद्य मिळणार आहे.
यासाठी अधिक्षक उत्पादनशुल्क यांच्याकडे अर्ज करावा लागणार असून त्यांच्या मंजुरीनंतर मद्यविक्रीचे परवाने दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रतिवर्ष एक लाख रूपये परवाना शुल्क आणि दोन लाख रूपये सुरक्षा ठेव द्यावी लागणार आहे. परवानाधारकाने फक्त मंजूर सुविधा क्षेत्रामध्ये मद्य पिण्यासाठी अनुमती द्यावी.
“परवाना सुरुवातीला एक ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी जारी केला जाऊ शकतो. त्यानंतर, एका वेळी पाच वर्षांपर्यंत त्याचे नूतनीकरण केले जाऊ शकते. २१ वर्षे पूर्ण झालेल्यांना हे परवाने दिले जातील.
गुजरात हे महात्मा गांधी यांचे राज्य असल्याने त्या राज्यात दारू बंदी लागू आहे. पण त्यातून गिफ्ट सिटीला अपवाद करण्यात आला आहे. अनेक संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे.





