गांधीनगर : जीवन चलने का नाम… या गाण्याचे बोल गुजरातमधील एका कुटुंबाने चपखलपणे सिद्ध केले आहेत. दमन ठाकोर आणि त्यांच्या कुटुंबाने अहमदाबाद ते लंडन या सर्वात लांब प्रवासाचा विक्रम केला आहे. ठाकोर कुटुंबाने अहमदाबाद ते लंडन हे 10,500 किलोमीटरचे अंतर 73 वर्षांच्या जुन्या कारमध्ये 73 दिवसांत कापले. वास्तविक, हा प्रवास गेल्या वर्षी पूर्ण झाला. मात्र याचे सर्व तपशील ठाकोर कुटुंबाने आता जाहीर केले आहेत. त्यांचा हा प्रवास सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ठाकोर आणि त्यांचे कुटुंब त्यांच्या 1950 च्या एमजीवायटीकारने (लाल परी) या रोमांचक प्रवासाला निघाले. सुमारे अडीच महिन्यांत त्यांनी 16 देशांचा दौरा केला. या प्रवासाचा खर्च जवळपास एका मर्सिडीजच्या किमती इतकाच आहे. 12 ऑगस्टपासून हा प्रवास सुरू झाला ठाकोर यांनी सांगितले की, त्यांची व्हिंटेज कार ब्रिटनमधील अबिंग्डन येथील एका कारखान्यात तयार करण्यात आली होती. आमचे गंतव्यस्थान डोळ्यासमोर ठेवून आम्ही गाडीने प्रवासाचे नियोजन केले. १२ ऑगस्ट २०२३ रोजी अहमदाबादहून आम्ही निघालो. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी ते मुंबईहून सागरी मार्गाने दुबईला रवाना झाले. 28 ऑगस्टला आम्ही दुबईला पोहोचलो. आमचे कुटुंब दुबईहून रस्त्याने निघाले आणि २६ ऑक्टोबरला लंडनला पोहोचले. 11 महिन्यांत लाल परी तयार झाली या लाल परी यात्रेच्या तयारीसाठी 11 महिने लागले. या काळात गुजरातच्या आसपास अनेक चाचणी मोहीम घेण्यात आली. आमच्याकडे आधीच आंतरराष्ट्रीय परवाना होता. यानंतर प्रत्येक नवीन देशानुसार रोड टॅक्स आणि विमा शुल्क जमा करण्यात आले. ठाकोर कुटुंबीयांनी या 73 दिवसांच्या साहसाला वेड, थकावट आणि रक्ताचा प्रवास म्हटले आहे. व्हिंटेज कारमध्ये अशी अतुलनीय कामगिरी करणारे ते पहिले कुटुंब असल्याचे ठाकोर कुटुंबाचे म्हणणे आहे.