गणपती विसर्जनावेळी मोठी दुर्घटना, 10 भाविक बुडाले; पाच जणांचे मृतदेह काढले बाहेर

गांधीनगर – गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यातील देहगाम येथे गणेश विसर्जनाच्या वेळी 10 भाविक पाण्यात बुडाले. सायंकाळी सात वाजेपर्यंत यातील पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले, तर इतरांचा शोध सुरू आहे. प्रांताधिकारी आणि अग्निशमन दलाचा ताफा घटनास्थळी दाखल झाले आहे.
काही दिवसांपूर्वी पाटणच्या सरस्वती नदीत गणेश विसर्जनाच्या वेळी 5 जणांचा बुडून मृत्यू झाला होता, त्यानंतर आता देहगाममध्येही अशीच एक दर्घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, देहगामच्या वसना सोगठी गावातून जाणाऱ्या मेश्वो नदीत गणेश विसर्जनाच्या वेळी 10 जणांचा बुडून मृत्यू झाला.
गणेश विसर्जनाच्या वेळी तरुणाचा पाय घसरल्याने हा अपघात झाला. यानंतर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना एकामागून एक 10 जण पाण्यात बुडाले. यापैकी 5 जणांचे मृतदेह सापडले आहेत. सध्या अग्निशमन दल आणि स्थानिक पोहणाऱ्यांशिवाय प्रांताधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून नदीत पडलेल्या इतर लोकांचा शोध घेत आहेत.
यंदा गणेश विसर्जनाच्या वेळी राज्यात अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. देहगामपूर्वी पाटणमध्ये चार, जुनागडमध्ये एक आणि नडियादमध्ये दोन जणांचा अशाच एका घटनेत मृत्यू झाला होता.





