Droupadi Murmu : लोकांचा न्यायावरील विश्वास म्हणजे सुशासन; राष्ट्रपती मुर्मू

गांधीनगर : कोणतीही न्यायव्यवस्था खरोखरच समावेशक असेल तरच ती मजबूत मानली जाईल. २०२४ मध्ये तीन नवीन फौजदारी कायदे लागू होणे हा भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण होता. आता गुन्हेगारांमध्ये पकडले जाण्याची आणि शिक्षा होण्याची भीती आणि सामान्य लोकांचा न्याय मिळण्यावरील विश्वास ही सुशासनाची वैशिष्ट्ये आहेत, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी म्हटले आहे
गांधीनगर येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभात मुर्मू बोलत होत्या. यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे देखील उपस्थित होते. राष्ट्रपती म्हणाल्या की, गुन्हेगारीवरील नियंत्रण, गुन्हेगारांना पकडले जाण्याची आणि शिक्षा होण्याची भीती आणि सामान्य लोकांचा न्याय राखण्यावरील विश्वास ही सुशासनाची वैशिष्ट्ये आहेत.
आपल्या देशात न्यायावर आधारित सामाजिक व्यवस्था सर्वोत्तम मानली जाते. एनएफएसयूमधून पदवीधर होणाऱ्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना मुर्मू म्हणाल्या की, आर्थिक कारणांमुळे कोणत्याही व्यक्तीला न्यायापासून वंचित ठेवता कामा नये. परंपरा आणि विकासाच्या समन्वयातून आपण एक विकसित देश बनण्याच्या प्रक्रियेत आहोत, जो न्यायावर आधारित आहे. समाजातील सर्व घटकांना, विशेषतः दुर्बल आणि वंचितांना न्याय मिळवून देणे हे विद्यापीठ पदवीधरांचे ध्येय असले पाहिजे.





