Plane Crash : चार्टर विमान कोसळले; दोन पायलटांसह 8 जणांचा मृत्यू
Plane Crash : अमेरिकेतील पश्चिम अलास्कात रडार साइटजवळ दोन इंजिनांचे चार्टर विमान कोसळले. दोन पायलट आणि सहा प्रवाशांसह आठही जणांचा मृत्यू झाला.

Plane Crash : अमेरिकेतील पश्चिम अलास्कामध्ये आठ जणांना घेऊन जाणारे चार्टर विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेत दोन पायलट आणि सहा प्रवाशांसह विमानातील सर्व आठ जणांचा मृत्यू झाला. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डने (NTSB) या दुर्घटनेची पुष्टी केली आहे.
NTSBचे अध्यक्ष क्लिंट जॉनसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन इंजिन असलेले सेसना चार्टर विमान गुरुवारी अँकोरेज येथून केप न्यूएनहॅमच्या दिशेने जात होते. त्यावेळी पश्चिम अलास्कातील एका दुर्गम रडार साइटजवळ विमान कोसळले.
घटनेनंतर तातडीने बचाव आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. NTSB, अलास्का स्टेट ट्रूपर्स आणि बचाव समन्वय केंद्राचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अमेरिकन लष्करानेही विमानातील सर्व आठ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली.
हे विमान केप न्यूएनहॅमकडे जात होते. केप न्यूएनहॅम येथे हवाई दलाची धावपट्टी असून, ती लांब पल्ल्याच्या रडार स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी वापरली जाते. दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, तपास यंत्रणांकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे.





