Baramati Plane Crash : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळाजवळ (Baramati Plane Crash)झालेल्या बोम्बार्डियर लियरजेट ४५ विमान दुर्घटनेप्रकरणी कर्नाटकातील बंगळुरूच्या शेशाद्रीपुरम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत (Baramati Plane Crash) महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला होता. रोहित पवार यांनी ही दुर्घटना केवळ अपघात नसून, मोठ्या गुन्हेगारी कटाचा भाग असू शकतो, असा गंभीर आरोप केला होता. आजच विधानसभेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि सांगितले, “नागपूरात बस स्टॉपवर चार्जर चोरीला गेला म्हणून गुन्हा दाखल होतो, चप्पल चोरीला गेली म्हणून गुन्हा दाखल होतो, अंगणात झाडाच्या फांद्या आल्या म्हणून गुन्हा दाखल होतो, पण अजित दादांच्या संदर्भात गुन्हा दाखल होत नव्हता. ज्याचं जळतं त्यालाच कळतं.” Rohit Pawar दुर्घटनेची पार्श्वभूमी मुंबईहून बारामतीकडे येणारे VT-SSK नोंदणी असलेले लियरजेट ४५ विमान २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ८:४३ ते ८:४५ वाजण्याच्या सुमारास बारामती विमानतळाजवळ कोसळले. हे विमान VSR Ventures Private Limited या कंपनीद्वारे चालवले जात होते. दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचा वैयक्तिक सुरक्षा अधिकारी, दोन पायलट आणि एक फ्लाइट अटेंडंट अशा पाच जणांचा मृत्यू झाला. रोहित पवारांची ‘झिरो FIR’ तक्रार मृत अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १७३(१) अंतर्गत ‘झिरो FIR’ नोंदवली. यापूर्वी त्यांनी २५ फेब्रुवारी रोजी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे आणि २६ फेब्रुवारी रोजी बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र दोन्ही ठिकाणी FIR नोंदवण्यात आला नव्हता. पुणे सीआयडीने केवळ अपघाती मृत्यू अहवालाच्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगितले होते. तक्रारीतील मुख्य आरोप रोहित पवारांच्या तक्रारीनुसार, ही दुर्घटना अपघात नसून उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य करणारा गुन्हेगारी कट असू शकतो. तक्रारीत खालील गंभीर बाबींचा उल्लेख आहे : – विमान सुरक्षेच्या नियमांचे पद्धतशीर उल्लंघन – देखभाल आणि ऑपरेशनमध्ये गंभीर निष्काळजीपणा – नोंदींची बनावट कागदपत्रे तयार करणे – विमान ५००० तासांच्या ‘टाइम बिफोर ओव्हरहॉल’ (TBO) मर्यादेच्या अत्यंत जवळ असतानाही व्यावसायिक वापरासाठी चालू ठेवणे – अधिकृत नोंदींमध्ये उड्डाण तास कमी दाखवणे; प्रत्यक्षात ८००० तासांपेक्षा जास्त उड्डाण झाल्याची शक्यता २४ फेब्रुवारी २०२६ रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने सादर केलेल्या सुरक्षा लेखापरीक्षण अहवालात VSR Ventures ची काही विमाने निष्काळजीपणामुळे उड्डाणासाठी अयोग्य असल्याचे नमूद करण्यात आले होते आणि ती विमाने ग्राउंड करण्यात आली होती. पुढील तपासाची मागणी रोहित पवार यांनी या प्रकरणाचा स्वतंत्र, सखोल आणि निष्पक्ष तपास करण्याची मागणी केली आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) च्या तांत्रिक चौकशीबरोबरच गुन्हेगारी तपासाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या गुन्ह्याच्या (Baramati Plane Crash) नोंदणीनंतर महाराष्ट्र राजकारणात नवी चर्चा सुरू झाली असून, रोहित पवार यांच्या न्यायाच्या लढ्याला समर्थन मिळत आहे. प्रकरणाचा पुढील तपास बंगळुरू पोलिसांकडून सुरू झाला असून, सर्व संबंधित पक्षांना नोटीस पाठवल्या जाणार आहेत.