Alandi News : आळंदी शिवसेनेत राडा! नगरपरिषदेच्या १५ कोटींच्या निधीवरून ‘क्रेडिट वॉर’; एका भेटीने खळबळ का उडाली?
Alandi News : शिष्टमंडळाचे नियोजन ठरलेले असताना नगरसेवक सुरेश झोंबाडे यांची उपमुख्यमंत्र्यांकडे परस्पर एन्ट्री; शहरप्रमुख राहुल चव्हाण यांनी व्यक्त केली उघड नाराजी.

Alandi News – तीर्थक्षेत्र आळंदीच्या विकासकामांसाठी १५ कोटी २० लाख रुपयांच्या निधी मंजुरीसाठी नगरसेवक सुरेश नाना झोंबाडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पत्र दिले आहे. मात्र, या भेटीवरून आता आळंदीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पक्षाचे नियोजित शिष्टमंडळ आणि शहरप्रमुखांना कोणतीही पूर्वकल्पना न देता झोंबाडे यांनी ही भेट घेतल्यामुळे स्थानिक शिवसेनेत संतापाची लाट उसळली असून, वैयक्तिक श्रेय लाटण्यासाठीच हा बनाव केल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार शरद सोनवणे, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, शहरप्रमुख राहुल चव्हाण आणि नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिष्टमंडळासह उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याचे निश्चित झाले होते. मात्र, सर्व प्रमुख नेत्यांना आणि शिवसेनेच्या इतर नगरसेवकांना अंधारात ठेवून झोंबाडे यांनी परस्पर भेट घेत मागणीपत्र सादर केले. पक्षांतर्गत प्रोटोकॉल धाब्यावर बसवून स्थानिक संघटना आणि शहरप्रमुखांना डावलल्याने अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे.
“आळंदीच्या विकासासाठी आमदार शरद सोनवणे, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, विरोधी पक्षनेते आदित्य घुंडरे, शिवसेना नगरसेवक असे आम्ही सर्वजण मिळून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेणार असल्याचे आधीच ठरले होते. तसे नियोजनही झाले होते. मात्र, आम्हाला कोणतीही कल्पना न देता किंवा विश्वासात न घेता नगरसेवक झोंबाडे यांनी ही भेट घेतली.”
– राहुल चव्हाण, आळंदी शहरप्रमुख, शिवसेना
कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी
एकत्रितपणे प्रयत्न करून निधी आणण्याऐवजी, वैयक्तिक प्रसिद्धीसाठी हे ‘क्रेडिट वॉर’ सुरू करण्यात आल्याचे बोलले जात आहे. जिल्हास्तरावरील नेते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नियोजित भेटीपूर्वीच झोंबाडे यांनी मारलेली ही ‘एन्ट्री’ पक्षातील शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.





