Shivsena: सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला मदत करणे आणि पक्षश्रेष्ठींच्या आदेशाला केराची टोपली दाखवणे आमदार महेश शिंदे यांना महागात पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी महेश शिंदे यांच्याविरोधात कठोर आणि ‘कटू’ कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नेमका वाद काय? (Shivsena) सातारा जिल्हा परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असतानाही, भाजपने चतूर खेळी करत महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरवले. महेश शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपच्या उमेदवाराला (पत्नीला) मतदान केल्याने शिवसेनेची हक्काची सत्ता हुकली. ही बाब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पचनी पडलेली नाही. संजय शिरसाट काय म्हणाले? Shivsena: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ आमदाराबाबत घेणार मोठा निर्णय? पुढच्या आठवड्यात… संजय शिरसाटांचे संकेत महेश शिंदे यांच्या भूमिकेवर भाष्य करताना संजय शिरसाट म्हणाले की, “महेश शिंदे यांनी जो प्रकार केला आहे, तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अजिबात मान्य नव्हता. त्यांना यापूर्वी समजही देण्यात आली होती, मात्र त्यांच्या वर्तनात बदल झालेला नाही. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री लवकरच यावर निर्णय घेतील. प्रसंगी काही कटू निर्णय घ्यावे लागले तरी पक्ष मागे हटणार नाही.” महेश शिंदेंच्या विरोधकांना पक्षात स्थान – महेश शिंदेंची कोंडी करण्यासाठी शिवसेनेने कोरेगावचे त्यांचे कट्टर विरोधक राजाभाऊ बर्गे यांना पक्षात प्रवेश दिला आहे. यावर शिरसाट यांनी स्पष्ट केले की, “कोणी विरोधक आहे म्हणून त्याला पक्षात घ्यायचे नाही, ही भूमिका चुकीची आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच हे प्रवेश झाले आहेत. पक्षापेक्षा आपण मोठे आहोत, असे कुणी समजू नये. तशी चूक केल्यास त्याचे परिणाम भोगावेच लागतात.” (Shivsena) पुढच्या आठवड्यात निर्णयाची टांगती तलवार – साताऱ्यातील शिवसेनेच्या अंतर्गत वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या आठवड्यात अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. महेश शिंदे यांना प्रत्यक्ष बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, मात्र शिस्तीचा भंग झाल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांच्यावर मोठी कारवाई होण्याची चिन्हे आहेत. (Shivsena)