Alandi News – इंद्रायणी घाट परिसराचे डिजिटल मॉनिटरिंग; पुरातन कुंडांच्या पुनरुज्जीवनालाही हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. इंद्रायणी नदी घाट हे आळंदीतील पर्यटन व धार्मिक विधींचे मुख्य केंद्र असून भाविक व पर्यटकांची मोठी वर्दळ असते. सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तसेच अनुचित प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी घाट परिसराचे डिजिटल मॉनिटरिंग करणे आवश्यक असल्याने आळंदी नगरपरिषद सभागृहाने सर्वानुमते सीसीटिव्ही व संबंधित यंत्रणा बसविण्यास मंजुरी दिली असल्याची माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली. नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद सभागृहात पहिली सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत विविध १११ विकास कामांना मंजुरी देण्यात आली. शहरातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पुरातन कुंडांच्या पुनरुज्जीवन व सुशोभीकरणालाही मान्यता दिली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीमुळे आळंदी हे तीर्थक्षेत्र जगभरात प्रसिद्ध असून दरवर्षी लाखो वारकरी व पर्यटक येतात. मात्र, अनेक पुरातन कुंडे गाळ साचणे व देखभालीअभावी दुर्लक्षित अवस्थेत आहेत. कुंडांचे जतन व संवर्धन करणे ही सांस्कृतिक जबाबदारी असल्याचे सभेत नमूद केले. कुंडांच्या पुनरुज्जीवनामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल तसेच परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. पर्यटकांची संख्या वाढल्यास स्थानिक व्यावसायिकांनाही त्याचा लाभ होणार आहे. नगरपरिषद हद्दीतील हवेली भागातील संपूर्ण परिसर खेड हद्दीतील आळंदी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यासही मंजुरी दिल्याचे मुख्याधिकारी खांडेकर यांनी सांगितले.