आळंदी – श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ‘उंबरठ्याच्या पलीकडे’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून स्नेहा गायकवाड( पब्लिक स्पीकर, रायटर, पोएट अँड ऍक्टर ) यांनी उंबरठ्या पलीकडे…… या विषयाला न्याय देताना स्त्रियांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवन जगताना योग्यवेळी उंबरठा कसा ओलांडायचा असे मत व्यक्त करीत स्त्रीच्या वाट्याला आलेले लिंगभेद, वर्णभेद, ऍसिड हल्ले, स्त्रीभ्रूण हत्या, विधवा, आत्महत्या, देवदासी प्रथा, बालविवाह, वेश्याव्यवसाय, हुंडाबळी, बलात्कार व मुलींचे शोषण या कुप्रवती संदर्भात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मार्टिन ल्युथर किंग व मेरीटोम यांनी समाजव्यवस्थेवर कसे ताशेरे ओढले तसेच स्वअस्तित्व सिद्ध करण्यासाठी स्त्री जीवनात कुटुंबव्यवस्थेची किती महत्त्वपूर्ण भूमिका असते हे विविध उदाहरणे देत सखोल असे मार्गदर्शन केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी स्त्रियांच्या व्यथा आणि वेदना मांडतांना स्त्री आणि पुरुष एकाच नाण्याच्या दोन बाजू असून स्त्रियांना स्वअस्तित्व सिद्धतेसाठी पुरुषांच्या सहकार्याची आवश्यकता व्यक्त करीत पुरुषांनी महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वअण्णासाहेब कर्वे यांचा आदर्श जपला पाहिजे तसेच स्त्री ही कुटुंबाच्याच आधाराने शारीरिक सबल आणि आर्थिक सबल होऊ शकते असे विवेचन करत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी मयूर मुरलीधर ढमाले (खजिनदार- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ ) यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विशाल गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. कृष्णा मिटकर यांनी केले. आभार प्रा. दिपाली ताम्हाणे यांनी मानले.
या कार्यक्रमाला सर्व विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. माणिक कसाब यांनी दिली.