Alandi Election Result: मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार निकालाचा थरार

प्रभात वृत्तसेवा
आळंदी – २० दिवसाच्या विलंबाने होत असलेली आळंदी नगरपरिषद निवडणूक मतमोजणी प्रक्रिया आज (दि. २१) रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार असून संपूर्ण प्रक्रिया नगरपरिषदेच्या मुख्य कार्यालयामध्ये होणार आहे. याबाबतची माहिती प्रशासकीय अधिकारी माधव खांडेकर यांनी दिली. ही प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे.
यासाठी एकूण ३८ अधिकारी आणि १५ कर्मचारी असे ५३ जणांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणी ठिकाणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे. केवळ अधिकृत पासधारकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार, मतमोजणी केंद्र परिसरामध्ये शांतता राखण्याचे आवाहन नागरिकांना आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींना करण्यात आले आहे.
मतमोजणी प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित आणि पारदर्शक पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष सूचना दिलेल्या आहेत. निकालाची उत्सुकता शिगेला असताना आळंदी पोलिस आणि आळंदी नगरपरिषद तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.





