Alandi Election : आळंदीत महिला नेतृत्वाला संधी? संगिता चव्हाण यांच्या उमेदवारीने प्रभाग १० मधील राजकीय समीकरणे बदलली

प्रभात वृत्तसेवा
आळंदी – आळंदी नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वारे आता चांगलेच जोर धरू लागले असून, प्रभाग क्रमांक 10 मधील लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.याच पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गटाच्या) शिवसेना आळंदी शहरप्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी संगिता राहुल चव्हाण नगरसेवक पदासाठी उमेदवार असणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यांनी जोरदार तयारी देखील सुरू केली आहे. त्यांच्या कार्यतत्पर, सेवाभावी आणि संवादक्षम व्यक्तिमत्त्वामुळे त्या स्थानिक नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनल्या आहेत.
संगिता राहूल चव्हाण या गेली अनेक वर्षे सामाजिक आणि महिला संघटनांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. महिला बचत गटांना आधार देणे, स्वच्छता उपक्रम राबवणे, पाणीपुरवठा समस्यांवर लक्ष केंद्रित करणे, तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणींवर तातडीने प्रतिसाद देणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य राहिले आहे. यामुळे प्रभागातील महिलांमध्ये त्यांची विशेष लोकप्रियता आहे.
शिवसेना (शिंदे गट) च्या शहर कार्यकर्त्यांनीही संगीता चव्हाण यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत प्रचारयंत्रणा सज्ज केल्याचे दिसत आहे. नागरिकांशी थेट संवाद साधत त्या जनतेची सेवक, विकासाची हमी या घोषणेसह प्रचार सुरू करत असल्याचे दिसते. आपला निर्धार स्पष्ट करताना संगीता चव्हाण म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आळंदीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा माझा निर्धार आहे. महिलांचा सशक्त सहभाग, स्वच्छ प्रशासन आणि लोकसेवा हेच माझे ध्येय आहे.
विकासकामांचे पाठबळ..
प्रभागात शिवसेनेने (शिंदे गट) केलेल्या विकासकामांचे मोठे पाठबळ संगीता चव्हाण यांच्या उमेदवारीला मिळत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून प्रभाग क्रमांक 10 मधील विकास कामांसाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करून देण्यात आला, ज्यामुळे या भागात चांगली विकासकामे झाली आहेत. विशेषतः आळंदी नगरपरिषद हद्दीतील कमलेश ऑटो ते आळंदी रोड ड्रेनेज लाईनचे काम पाठपुरावा करून पूर्ण करण्यात त्यांचा हातभार लागला आहे.




