Alandi Election : महायुतीत पुन्हा बिघाडी? आळंदी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीची ‘एकला चलो रे’ ची तयारी

प्रभात वृत्तसेवा
आळंदी – राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. मात्र, आपण वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून योग्य रणनीती आखूया. पक्षाची संघटनशक्ती मजबूत आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या प्रभागात जनसंपर्क वाढवावा आणि निवडणुकीसाठी सज्ज राहावे असे आवाहन माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.आगामी आळंदी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या तयारीला वेग दिला आहे. फ्रूटवाले धर्मशाळा येथे झालेल्या आढावा बैठकीत खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी उपस्थित पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन केले.
यावेळी तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, निर्मलाताई पानसरे, अरुण चांभारे, डी. डी. भोसले पाटील, विलास कुर्हाडे, नंदकुमार कुर्हाडे, प्रकाश कुर्हाडे, प्रदीप बवले, सचिन घुंडरे, श्रीधर कुर्हाडे, पुष्पाताई कुर्हाडे, रुपाली पानसरे, सौरभ गव्हाणे, निसार सय्यद, संदेश तापकीर, आनंद रनदिवे तसेच आळंदी शहरातील असंख्य इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.यानंतर पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पक्ष कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, इच्छुकांनी आपल्या प्रभागांमध्ये नियमित भेटीगाठी सुरू कराव्यात, दिवाळीच्या शुभेच्छा देत मतदारांशी संवाद साधावा.
स्थानिक पातळीवर महायुतीसोबत सन्मानाची वागणूक मिळाल्यास चर्चेतून निर्णय घेऊ; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे स्वतःच्या बळावर नगरपरिषद जिंकण्याची ताकद आहे. बैठकीत सुकाणू समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यात पक्षाचा निरीक्षकही सहभागी असणार आहे. ही समिती इच्छुक उमेदवारांची पडताळणी करून योग्य उमेदवारांची निवड करणार आहे. या बैठकीमुळे आळंदीत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीला आता खर्या अर्थाने सुरूवात झाल्याचे चित्र दिसून आले.





