“रामसेतू’च्या फर्स्ट लूकवर अक्षयने मागवले प्रेक्षकांचे मत

अक्षयकुमारने होळीच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या “रामसेतू’ या आगामी सिनेमाचे शूटिंग सुरू केले आहे. शूटिंग सुरू झाल्याचे जाहीर करतानाच अक्षयने “रामसेतू’मधील आपला फर्स्ट लूक देखील रिलीज केला आहे. “रामसेतू’मध्ये तो आर्किओलॉजिकल संशोधकाच्या रोलमध्ये दिसणार आहे.
म्हणूनच त्याचा रोल एकदम खास आहे. भुरभूर उडणारे केस आणि डोळ्यांवर गोल काचांचा चष्मा त्याला अगदी शोभून दिसतो आहे. अक्षय प्रथमच अशा संशोधकाच्या रोलमध्ये दिसणार आहे. म्हणून आपल्या लूकबाबत तो थोडा सतर्क आहे. त्याने आपल्या लूकबाबत प्रेक्षकांचे मतही विचारले आहे. “रामसेतू’ हा सिनेमा रामायणाच्या काळात राम आणि वानरसेनेने श्रीलंकेपर्यंत बांधलेल्या दगड-धोंड्यांच्या पुलाच्या संदर्भात आहे.
हा रामसेतू अजूनही भग्नावस्थेत अस्तित्वात आहे आणि तो जतन करण्यासाठी प्रयत्न केले जाणे आवश्यक आहे, असे मानले जाते आहे. रामसेतूच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचे पुरावे काही वर्षांपूर्वी मिळाले होते. “रामसेतू’मध्ये जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा देखील लीड रोलमध्ये आहेत. गेल्या वर्षी घोषणा झालेला “रामसेतू’ पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.





