Akshay Shinde Encounter : ‘पोलिसांनी स्वरक्षणार्थ त्याच्या दिशेने गोळीबार केला…’; गृहमंत्री फडणवीसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Akshay Shinde Encounter | Devendra Fadnavis : बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने सोमवारी (२३ सप्टेंबर) पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडली आहे. यात त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना घडली तेव्हा शिंदे याला पोलीस कोठडीत घेण्यात आले होते.
त्याने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला. त्याला रोखण्याचा प्रयत्न करताना एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ निर्माण झाली असून, अनेक राजकीय नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत.
दरम्यान, या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, “या प्रकरणातील आरोपीच्या पूर्व पत्नीने लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती.
यासंदर्भात चौकशी करण्याकरिता त्याला नेण्यात येत होतं. त्यावेळी त्याने पोलिसांजवळील बंदूक हिसकावून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनीही स्वरक्षणार्थ त्याच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. त्याच्या मृत्यूबाबत डॉक्टरांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, मला जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार त्याचा मृत्यू झाला आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ‘विरोधकांकडून प्रत्येक गोष्टीचं राजकारण केलं जातं. हा तोच विरोधीपक्ष आहे, जो आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत होता. मात्र, आता आरोपीने पोलिसांवर गोळाबार केला, तेव्हा विरोधीपक्षाकडून आरोपीची बाजू घेतली जात आहे. हे चुकीचं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
घडलेल्या संपूर्ण प्रकरणावर आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “बदलापूर प्रकरणातील आरोपीवर पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचारचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात पोलीस त्याला तळोजा कारागृहातून घेऊन येत असताना ही घटना घडली आहे. या दरम्यान त्याने पोलिसांवर गोळी झाडली.
यानंतर पोलिसांनी स्वरक्षणासाठी त्याच्यावर गोळी झाडली. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहे. एपीआय मोरे यांच्यावर आरोपीने फायरिंग केली. पोलिसांनी बचावासाठी त्याच्यावर गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती आली आहे. ज्याने या लहान मुलींवर अन्याय केला. आधी विरोधक म्हणत होते की त्याला फाशी द्या. आता विरोधक त्याची बाजु घेत असतील तर ते निंदणीय आहे. असं एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “विरोधी पक्षाला विरोधात बोलायचा काहीही अधिकार आहे. पोलीस जखमी आहे एपीआय दर्जाचा त्याच्याबाबत विरोधकांना काहीही वाटत नाही का. जे पोलीस कायदा सुव्यस्था राखण्यासाठी काम करतात. उन्हात पावसात थंडी वाऱ्यात काम करतात. त्या पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं अशा वेळी विरोधकांनी असं वक्तव्य करणं दुर्दैवी आहे.
या प्रकरणात चौकशी होईल आणि सत्य समोर येईल. विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. बहीण योजनेनेने ते बिथरले आहेत. त्यामुळे ते उलटसुलट आरोप करत आहेत.’ असं देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.





