Bhool Bhulaiyaa 4 : अक्षय कुमारची विशेष भूमिका असलेल्या भूल भुलैया सिनेमाने बॅालिवूडमध्ये मोठा इतिहास रचला. या सिनेमाची कथा दाक्षिणात्य सिनेमातील चंद्रमुखी सिनेमाचे हिंदी अडपटेशन होते. तरीही भुल भुलैया सिनेमाने आपले वेगळेपण जपत प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळवली. या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर सिनेमाचा दुसरा आणि तिसरा भाग रिलीज करण्यात आला. याही भागांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून आता या सिनेमाचा चौथा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याविषयीची एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी ‘भूल भुलैया ‘ सिनेमात कार्तिक आर्यन आणि अक्षय कुमार यांना कास्ट करण्यासाठी मोठी योजना आखली आहे. चौथ्या भागात हे दोन्ही कलाकार एकत्र दिसू शकतात, अशी चर्चा आहे. भूल भुलैया दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात कार्तिक आर्यनने मुख्य भूमिका केली होती. हे दोन्ही सिक्वलपट बॅाक्स अॅाफिसवर हिट ठरले. दोघेही एकत्र दिसणार असल्याने दोन्ही स्टार्सच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, दोघांनाही एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक झाले आहेत. मात्र, निर्मात्यांनी अद्यापर्यंत भूल भुलैया ४ मध्ये अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यनच्या कास्टिंगची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. कार्तिक आर्यन त्याच्या आगामी तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी सिनेमात दिसणार आहे. २५ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कार्तिक आर्यनसोबत अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमार सध्या त्याच्या “भूत बांगला”, “हैवान”, “वेलकम टू द जंगल” आणि “हेरा फेरी ३” यासह अनेक मोठ्या बजेटच्या सिनेमांमध्ये व्यस्त आहे. हेही वाचा : तुला वेगळे राहायचे तर राहा…”; लग्नाआधी सोनाक्षीने पती झहीरला स्पष्टच सांगितले