Maharashtra Politics : मोठी घडामोड..! १६ नगरसेवकांचं तडकाफडकी निलंबन; राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Politics : अकोला महानगरपालिकेत महापौर शारदा खेडकर यांनी १६ नगरसेवकांना निलंबित केले आहे.

Maharashtra Politics : अकोला महानगरपालिकेत आज मोठी राजकीय घडामोड घडली असून महापौर शारदा खेडकर यांनी तब्बल १६ नगरसेवकांचे तात्काळ निलंबन केले. या कारवाईमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा सुरू असताना हा प्रकार घडला. २०२५-२६ च्या सुधारित आणि २०२६-२७ च्या अंदाजपत्रकावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्षातील नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या आंदोलन करत सुमारे ३० मिनिटे कामकाज ठप्प केले. Maharashtra Politics
विरोधकांनी ‘५० खोके एकदम ओके’ अशा घोषणा देत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल यांनी माफी मागावी, अशी मागणीही लावून धरली. यामुळे सभागृहातील वातावरण अधिकच तापले.
या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर महापौर शारदा खेडकर यांनी सभागृहातील गैरवर्तनाचा ठपका ठेवत १६ नगरसेवकांना पुढील तीन बैठकींसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला. मात्र निलंबनानंतरही नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. Maharashtra Politics
दरम्यान, निलंबित नगरसेवकांना अखेर पोलिसांच्या मदतीने सभागृहाबाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे महानगरपालिकेतील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.
याचवेळी पत्रकारांनाही सभागृहात प्रवेश नाकारण्यात आल्याने त्यांनी प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. “आयुक्त, महापौर आणि सभापती यांनी चर्चा करावी,” अशी मागणी पत्रकारांनी केली असून, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या सर्व घडामोडींमुळे अकोल्यातील राजकारण पुन्हा एकदा तापल्याचे चित्र दिसत आहे.





