पाटणा : आम्ही भारतीय जनता पार्टीला अवधमध्ये (अयोध्या) पराभूत केले, मगधमध्ये तुम्ही त्यांना पराभूत करा असे आवाहन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज मतदार हक्क यात्रेदरम्यान केले. बिहारची ही एक महत्त्वाची निवडणूक आहे व त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. येथे असलेला हा उत्साह सांगत आहे की जनता आता भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांना पराभूत करणार आहे असेही अखिलेश यादव म्हणाले. अखिलेश शनिवारी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजद नेते तेजस्वी यादव यांच्यासह मतदार हक्क यात्रेत सामील झाले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. १७ ऑगस्ट रोजी सासाराम येथून सुरू झालेली १६ दिवसांची ही मतदार हक्क यात्रा १ सप्टेंबर रोजी पाटण्यामध्ये विशाल पदयात्रेने संपन्न होणार आहे. भाजपने निवडणूक आयोगाला जुगाड आयोग बनवले आहे. विशेष सघन आढाव्यापेक्षा (एसआयआर) वेडा निर्णय कोणता असूच शकत नाही. बिहारने एकदा भाजपचा रथ थांबवला होता आणि यावेळीही बिहारचे लोक भाजपचा रथ थांबवतील असा दावा त्यांनी केला. अखिलेश यादव पुढे म्हणाले, भारतीय जनता पार्टी लोकांचा वापर करते. ती लोकांचा वापर करेल आणि नंतर त्यांचा नाश करेल. निवडणूक आयोग भाजपच्या सहकार्याने काम करत आहे, बिहारच्या लोकांनी हे देखील पाहिले आहे की जिथे तरुण स्थलांतरित व्हायचे, तिथे तेजस्वी यांनी त्यांना नोकऱ्या देण्याचे काम केले होते. मात्र यावेळी भाजप स्थलांतर करणार आहे. भाजप प्रथम तुमचा मतदानाचा अधिकार हिसकावून घेईल, नंतर रेशनचा अधिकार, नंतर नोकरीचा अधिकार, ते आपल्याला रस्त्यावर आणू इच्छितात. ५ हजार वर्षांपासून सुरू असलेला भेदभाव आणि अन्यायाविरुद्धचा लढा अजूनही सुरू आहे.