Akhilesh Yadav : पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर अखिलेश यादव भडकले; म्हणाले, “तू BJP चा एजंट असून, तुम्ही विकले गेले आहात…’

Akhilesh Yadav – भारतीय जनता पार्टीवर जाती आणि धर्माचे राजकारण करत असल्याचा आरोप सातत्याने करणारे अखिलेश यादव (Akhilesh Yadav) त्यांच्याच एका कृतीमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी जे काही केले व ते जे काही बोलले त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे त्यांच्यावर चहुबाजूने टीका होऊ लागली आहे.
गेल्या आठवड्यातील ही घटना आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी अखिलेश यादव मध्य प्रदेशात गेले होते. त्यावेळी तेथील एका पत्रकाराने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यांच्या संदर्भात केलेल्या एका टिप्पणीबाबत अखिलेश यांना प्रश्न विचारला. योगींनी तुम्हाला टोंटी चोर म्हटले असल्याचे या पत्रकाराने म्हटल्यावर अखिलेश यांचा संयम सुटला.
तुम्ही पत्रकार नाही, तुम्ही चष्मा लावून आले आहात, तू भारतीय जनता पार्टीचा एजंट आहे बेटा… अशी विधाने त्यांनी पत्रकाराशी बोलताना केली. त्यांनी संबंधित पत्रकाराला त्याचे नावही विचारले. आपले नाव नूर काझी असल्याचे पत्रकाराने सांगितले. त्यावर तुम्ही मुसलमान आहात? मुसलमानांची भाषा अशी असते? तुम्ही विकले गेले आहात क्या? खरेच तुम्ही पत्रकार आहात का अशी प्रश्नांची सरबत्ती करत अखिलेश यांनी आपल्या सहकाऱ्यांना त्या पत्रकाराचा फोटोही काढायला सांगितला.
नंतर समाजवादी पक्षाच्या ट्वीटर हॅंडलवर तो फोटो शेअर करत संबंधित पत्रकारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी मध्य प्रदेश पोलिसांकडे केली. अखिलेश यांनी योगी आदित्यनाथ कसे जातीयवादी आहे हे दर्शवण्यासाठी उदाहरण देताना सांगितले की त्यांनी जेंव्हा मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सोडले होते, तेंव्हा योगींनी ते गंगाजल मागवून अगोदर स्वच्छ केले होते. तुम्ही खालच्या जातीचे असाल तर तुमचे घर गंगाजल टाकून स्वच्छ केले जाईल असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, अखिलेश यांच्या या विधानापेक्षा त्यांनी पत्रकाराला जी वर्तणूक दिली ती त्यांना अडचणीची ठरली आहे. संबंधित पत्रकार ब्राम्हण असल्याचे समजून अखिलेश त्यांच्यावर भडकले. प्रत्यक्षात तो मुस्लिम असल्याचे समजल्यावर त्यांचीच अडचण झाल्याचे दावे काही जणांनी केले आहेत. काहींनी पत्रकाराची बाजू घेत समाजवादी पक्षच सगळ्यांत जातीयावादी असल्याची टीका केली आहे,
तर काहींनी मुळात योगी आदित्यनाथ अखिलेश यांच्याबाबत असे बोललेच नव्हते. संबंधित पत्रकाराने त्यांच्या तोंडी अखिलेश यांच्या विरोधातील काही वाक्य घुसवताना अगोदर अभ्यास करायला हवा होता आणि मगच माजी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायला हवा होता, असे म्हणत अखिलेश यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.





