Akhilesh Yadav : चीनवर अवलंबून राहण्यावरून अखिलेश यादव यांनी भाजपवर साधला निशाणा

लखनौ : समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी चीनवर वाढत्या प्रमाणात अवलंबून राहण्याच्या स्थितीबाबत इशारा दिला. त्यातून त्यांनी केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजपकडून आत्मनिर्भरता, स्वदेशी, चिनी वस्तूंवर बहिष्कार यांसारख्या घोषणा दिल्या जातात. पण, त्या जुमला (पोकळ शाब्दिक खेळ) ठरत आहेत.
चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर भारताने अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे भारताच्या उत्पादन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होईल. त्यातून महागाई, बेरोजगारी वाढेल. चीन स्वत:च्या वस्तूंनी भारतीय बाजारपेठ भरवून टाकेल. तो देश किमती आणि धोरणांवर प्रभाव टाकेल. बाजारपेठ काबीज केल्यावर चीन आर्थिक दबाव टाकेल. तो देश भारताच्या केंद्र सरकारलाही कमजोर बनवण्याचा प्रयत्न करेल.
त्यामुळे भारतीय भूमीवर अतिक्रमण केले तरी चीनला आव्हान देता येऊ शकणार नाही, अशी भूमिका अखिलेश यांनी मांडली. भाजप केंद्रात सत्तेवर आल्यापासून भारताचा भूभाग जैसे थे आहे की चीनच्या अतिक्रमणामुळे कमी झालाय ते सांगा, असे आव्हानही त्यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर असतानाच अखिलेश यांनी भाजप आणि केंद्र सरकारला घेरले.





