Satara DCC Bank Election: महायुतीतच थेट लढत? जिल्हा बँक निवडणुकीचे बिगुल वाजले; ९५५ संस्थांचे २,०११ ठराव दाखल
Satara DCC Bank Election: राष्ट्रवादीतील फुटीनंतर मकरंद पाटलांसमोर पकड टिकवण्याचे आव्हान, तर शंभूराज देसाई आणि शिवेंद्रसिंहराजेंच्या रणनीतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष.

Satara DCC Bank Election – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नसली, तरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण मात्र तापू लागले आहे. मतदारसंघ निश्चितीच्या प्रक्रियेला वेग आला असून, जिल्ह्यातील 955 सेवा सहकारी संस्थांचे तब्बल 2,011 ठराव दाखल झाल्याने निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. यामुळे सहकाराच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा सातारा जिल्हा बँक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
महायुतीतील प्रमुख घटक असलेल्या भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांनी स्वतंत्रपणे आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच महायुतीतील अंतर्गत राजकीय स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
भाजपची आक्रमक तयारी
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्हा बँकेच्या राजकारणावर गेल्या अनेक वर्षांपासून मजबूत प्रभाव मानला जातो. जिल्ह्यातील सहकार आणि राजकारणातील त्यांचे नेटवर्क लक्षात घेता, त्यांच्या भूमिकेशिवाय जिल्हा बँकेच्या सत्तेचे समीकरण पूर्ण होणे कठीण असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
राष्ट्रवादीची बदललेली समीकरणे
सन 2002 पासून सातारा जिल्हा बँकेच्या सत्तेवर पकड मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने प्रयत्न केले. अखेर 2007 मध्ये बँकेवरील प्रभाव प्रस्थापित करण्यात यश मिळाले. मात्र, आता पक्षात झालेल्या विभाजनामुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. अजित पवार गटासमोर जुनी ताकद टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे.
राष्ट्रवादी एकत्र असताना जिल्हा बँकेमध्ये राष्ट्रवादीच्यावतीने रामराजे नाईक निंबाळकर यांनी नेतृत्व केले होते. नेतृत्वाचा हा धनुष्यबाण आता मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या हातामध्ये आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हेच या गटासाठी जिल्हा बँकेच्या राजकारणात आशेचे स्थान आहे .
शिंदे गटाची सहकारात एन्ट्री?
शिवसेना (शिंदे गट) जिल्ह्याच्या सहकार राजकारणात आपली राजकीय ताकद वाढविण्यासाठी सक्रिय झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे, (ता. महाबळेश्वर) येथील आपल्या निवासस्थानी स्थानिक पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांशी चर्चा सुरू केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
सहकारातील पुढील रणनीतीबाबत या बैठकींना महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्यासमोरही आगामी निवडणुकीत राजकीय प्रभाव कायम ठेवण्याचे आव्हान आहे. पाटण तालुक्यातील अलीकडील राजकीय घडामोडींनंतर ते पुढील वाटचाल कशी करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
समन्वय की संघर्ष?
महायुतीतील तिन्ही पक्ष स्वतंत्र तयारी करत असले, तरी अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार्या चर्चांवर अवलंबून राहणार असल्याचे मानले जाते. जागावाटपावर एकमत झाल्यास अनेक जागा बिनविरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र प्रत्येक पक्षाने स्वतंत्र ताकद दाखविण्याचा निर्णय घेतल्यास जिल्हा बँकेची निवडणूक पुन्हा एकदा प्रतिष्ठेची आणि चुरशीची ठरणार आहे.






