Akash Deep : आशिया कपआधी भारतीय संघाला मोठा धक्का! आकाशदीप दुखापतीमुळे दुलीप ट्रॉफीतून बाहेर

Akash Deep Injury Blow for India : भारताने शुबमन गिलच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यात अप्रतिम कामगिरी केली. भारताने 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरोत सोडवली. या मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज आकाश दीपने अप्रतिम कामगिरी केली. आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. आकाश दीप याला दुखापत झाली आहे. त्यामुळे आकाशला दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे.
आकाशला इंग्लंड दौऱ्यातील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना त्रास जाणवत होता. त्यामुळेच आकाशला दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळता येणार नाही. आकाश दीप दुलीप ट्रॉफी स्पर्धेत इस्ट झोनसाठी खेळणार होता. इस्ट झोन संघाच्या नेतृत्वाची धुरा ईशान किशन याच्याकडे आहे. इंग्लंड दौऱ्यात जसप्रीत बुमराह यालाही दुखापत झाली होती. त्यानंतर आता आकाश दुखापतीच्या जाळ्यात अडकला आहे. भारतासाठी आशिया कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गोलंदाजांना दुखापत होणे चांगली चिन्हे नाहीत.
आशिया कप स्पर्धेसाठी आकाश दीपच्या नावाची चर्चा नव्हती. मात्र दुखापतीमुळे आकाश या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर झाला आहे. त्यामुळे आता आकाशला फिटनेसवर काम करावे लागणार आहे. आकाश वेळेत फिट झाल्यास त्याला वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळू शकते. भारतीय संघ आशिया कप स्पर्धेनंतर मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत उभयसंघात 2 ते 14 ऑक्टोबर दरम्यान 2 सामने खेळवण्यात येणार आहेत.
हेही वाचा – Khwaja Nafay : पाकिस्तानचा खेळाडू रनआउटनंतर संतापला, लाईव्ह सामन्यातच सहकाऱ्याला खडसावलं, पाहा VIDEO
आकाश दीपची इंग्लंड दौऱ्यातील कामगिरी –
आकाश दीप इंग्लंड दौऱ्यातील 5 पैकी एकूण 3 सामने खेळला. आकाशने या 3 सामन्यांमध्ये 13 बळी घेतले. तसेच आकाशने एका अर्धशतकासह एकूण 80 धावा केल्या. आकाशने पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात नाईट वॉचमॅन म्हणून खेळताना हे अर्धशतक झळकावले होते. आकाशने या खेळीसह आपण फलंदाजीही करु शकतो, हे देखील सिद्ध करुन दाखवले होते.





