Khwaja Nafay : पाकिस्तानचा खेळाडू रनआउटनंतर संतापला, लाईव्ह सामन्यातच सहकाऱ्याला खडसावलं, पाहा VIDEO

Khwaja Nafay Run Out Video Goes Viral : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टॉप एंड टी-20 मालिकेत पाकिस्तान शाहीन्स संघाने आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेश ‘अ’ संघाचा 79 धावांनी पराभव केला. 13 ऑगस्ट रोजी खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तान शाहीन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 227 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात बांगलादेश ‘अ’ संघ 16.5 षटकांत 148 धावांतच गारद झाला. दरम्यान या सामन्यातील रनआउटचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
ख्वाजा नफीच्या रनआउटचा व्हिडीओ व्हायरल –
या सामन्यादरम्यान पाकिस्तान शाहीन्सचा सलामीवीर ख्वाजा नफीने अर्धशतक झळकावत शानदार खेळी केली. मात्र, तो एक चोरटी धाव घेण्याच्या नादात ताळमेळच्या अभावाने रनआउट झाला. ज्यामुळे सहकारी यासिर खानवर चांगला संतापला. ही घटना 12व्या षटकात घडली. या षटकातील पहिला यासिर खानच्या पॅडवर लागून तिथचे बाजूला पडला. यानंतर ख्वाजाने धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण यासिरने नकार दिला. मात्र, तोपर्यंत ख्वाजा त्याच्या जवळ पोहोचला होता. यानंतर माघारी परतताना ख्वाजा रनआउट झाला.
From Juniors to Seniors, it’s Pakistan Cricket heritage 😄 pic.twitter.com/xNuWVuYNAU
— Cricket.com (@weRcricket) August 14, 2025
ख्वाजा नफी रनआउटनंतर चांगलाच संतापला –
ख्वाजा नफी रनआउट झाल्यानंतर चांगलाच संतापला. त्याने अगोदर रागाने आपली बॅट फेकून दिली. त्यानंतर यासिरला खडसावताना दिसला. ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या सामन्यात ख्वाजाने 31 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह 61 धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर ख्वाजाने यासिर खानसह पहिल्या गड्यासाठी 118 धावांची दमदार भागीदारी साकारली.
मसूद-अकरमने गोलंदाजीत केली कमाल –
पाकिस्तान शाहीन्सच्या गोलंदाजीचा जोरदार मारा बांगलादेश ‘अ’ संघाला रोखण्यात यशस्वी ठरला. शाद मसूद आणि फैजल अकरम यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले, तर मोहम्मद वसीमने 2 आणि उबैद शाह तसेच माज सादकत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. आता पाकिस्तान शाहीन संघ आपला पुढील सामना 16 ऑगस्त रोजी पर्थ स्कॉर्चर्स अकादमीविरुद्ध खेळणार आहे.





