अजितदादांच्या कृतीने सगळ्यांनाच अचंबित केलं; स्वतःच्या नावाची नेमप्लेट उचलली अन्…; पुण्यातील बैठकीत नेमकं काय घडलं?

Sharad Pawar | Ajit Pawar | आज १० जून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापन दिन असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दोन वेगवेळ्या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी काल पुण्यात वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूट येथील एका बैठकीत अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही नेते एकत्र एका मंचावर उपस्थित होते. यामुळे सगळ्यांचे लक्ष याकडे लागले होते.
अशातच अजित पवार यांनी केलेली कृती सर्वांचे लक्ष वेधून गेली. या मंचावर शरद पवार आणि अजित पवार यांची शेजारी-शेजारी आसन व्यवस्था करण्यात आली होती. दोघांच्याही नावाच्या नेमप्लेट ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, अजित पवार यांनी शरद पवार यांच्या शेजारी बसणं टाळलं, याची चर्चा दिवसभर करण्यात आली.
अजित पवार यांनी नेमकं काय केलं?
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि खासदार शरद पवार या दोन्ही नेत्यांच्या नेमप्लेट शेजारी ठेवण्यात आल्या होत्या. शरद पवार त्यांच्या नावाच्या नेमप्लेट असलेल्या खुर्चीत विराजमान झाले. मात्र, अजित पवार यांनी त्यांच्या शेजारी असलेल्या स्वतःच्या नावाची नेमप्लेट उचलून तिथे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नावाची नेमप्लेट ठेवली. यामुळे बाबासाहेब पाटील हे शरद पवारांच्या शेजारी स्थानपन्न झाले आणि अजित पवार हे पाटील यांच्या डाव्या बाजूच्या खुर्चीत विराजमान झाले. अजित दादांनी केलेल्या या कृतीची सर्वत्र मोठी चर्चा होती. त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.
दोन्ही ठिकाणी जोरदार शक्तिप्रदर्शन
आगामी काही महिन्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असून मोर्चेबांधणीची आखणी केली जात आहे. अशातच ठाकरे बंधू आणि पवार काका पुतणे एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत आहेत. मात्र, आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन स्वंतत्र वर्धापन दिन साजरे केले जाणार असून दोन्ही ठिकाणी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम बालेवाडी संकुलात तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडणार आहे, यामुळे दोन नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





