पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अभिनेते सयाजी शिंदे यांचा 66 वा वाढदिवस पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत थाटात साजरा झाला. या सोहळ्यात अजित पवारांनी आपल्या खास शैलीत तुफान फटकेबाजी करत उपस्थितांची मने जिंकली. सकाळपासून सुरू झालेला त्यांचा पुणे दौरा संध्याकाळीही गाजला, कारण त्यांनी सयाजी शिंदे यांच्यासाठी ‘पिंजरा’ चित्रपटातील ‘गडी अंगाने उभानी आडवा, त्याच्या रुपात गावरान गोडवा’ हे गाणं गायलं आणि सभागृहात हशा पिकवला. सयाजी शिंदे यांच्या वृक्षारोपण कार्याचं कौतुक करताना अजित पवार म्हणाले, “आमचा संकल्प आहे दरवर्षी 25 कोटी झाडं लावण्याचा आणि सत्ताकाळात 100 कोटी झाडं लावून जतन करण्याचा. यामुळे पुढील 20 वर्षांत निसर्ग संवर्धनात यश मिळेल.” सयाजी शिंदे यांच्या रांगड्या व्यक्तिमत्त्वावरही त्यांनी भाष्य केलं. “सयाजी आणि माझ्यात साधर्म्य आहे. स्पष्टवक्तेपणा आणि अस्सलपणा आम्हाला जोडतो,” असं म्हणत त्यांनी सयाजींची प्रशंसा केली. सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी नदीकाठच्या आणि दुर्गा देवी टेकडीवरील वृक्षतोडीबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर अजित पवारांनी मिश्कीलपणे उत्तर देत सभागृहात हास्याची लाट पसरवली. ते म्हणाले, “कुठून मी पुण्याचा पालकमंत्री झालो, असं वाटायला लागलंय! जो तो उठतो आणि मला उपदेश देतो. सगळा मक्ता मीच घेतलाय, यांनी फक्त सल्ले द्यायचे!” पिंपरी ते चाकण दरम्यान बारा पदरी रस्ता आणि सहा लेनचा पूल तसेच मेट्रो प्रकल्पावरही अजित पवारांनी भर दिला. “मी कामाचा माणूस आहे, अधिकाऱ्यांना कामाला लावलंय,” असं सांगत त्यांनी आपल्या कार्यशैलीवर प्रकाश टाकला. सयाजी शिंदे यांच्या आईबद्दलच्या पत्रवाचनाने सभागृहात भावनिक क्षण निर्माण झाले, तर अजित पवारांच्या फटकेबाजीने आणि गाण्याने हा सोहळा अविस्मरणीय ठरला.