पिंपरी | मावळात अजित पवारांचा नवा राजकीय डाव?

पिंपरी, {विशाल कुंभार} – ‘नाना आता तुम्ही वयस्कर झालात, आता कुणावर तरी ही जबाबदारी द्या ना. कधी देणार?’ हा सवाल करीत अजित पवारांनी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले यांना निवृत्तीचा जाहीर सल्ला दिला.
अजित पवारांचे हे वक्तव्य भाषणात जरी ओघाने आले होते, तरी त्यात अनेक राजकीय अर्थ दडलेले आहेत, हे वेगळे सांगायला नको.
साखर कारखान्याच्या आडून अजित पवारांनी मावळ विधानसभेचे गणित जुळवू पाहणारा नवा राजकीय डाव टाकल्याची चर्चा सध्या मतदारसंघात जोर धरत आहे.
मागील आठवड्यात मावळ विधानसभा क्षेत्रातील अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी कान्हे येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत आमदार सुनील शेळके यांनी आक्रमक भाषण करीत विरोधकांवर जोरदार प्रहार केला.
यानंतर अजित पवारांचे भाषण झाले. पवारांनी त्यांच्या भाषणात सुनील शेळके यांना सबुरीने घेण्याचा सल्ला देत आपल्याला सर्वांची गरज आहे, असे सांगितले.
त्यानंतर अजित पवारांनी त्यांच्या भाषणात सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती दिली. भाषण ऐन मध्यात आले असता, पवारांनी उसाला मिळणारा भाव या विषयाला हात घातला आणि लगोलग संत तुकाराम साखर कारखान्याच्या सद्यस्थितीवर बोट ठेवले.
नेमके काय म्हटले अजित पवार?
“आज मी बारामती तालुक्याचं प्रतिनिधित्व करतोय. तुमच्या संत तुकारामचा भाव किती आहे? (संत तुकाराम सहकारी साखर कारखाना). एकोणतीचशे, अठ्ठावीसशे पन्नास… (श्रोत्यांचे उत्तर) माझ्या सोमेश्वर कारखान्याचा भाव मी ३५७१ रुपये काढलाय. माळेगावचा भाव ३६३६ रुपये काढला. अशा पद्धतीने संस्था चालवायच्या असतात.” असे बोलून अजित पवारांनी संत तुकाराम कारखाना मागे पडल्याचे दाखवून दिले.
त्यानंतर लगेचच अजित पवारांनी कारखान्याच्या व्यवस्थापनावर भाष्य केले. “मी नानांना सांगत असतो, नाना तुम्ही आता वयस्कर झालात, आता कुणावर तरी ही जबाबदारी द्या ना. कधी देणार. काय आम्ही म्हातारे झाल्यावर देणार… मला कुणाचा अपमान करायचा नाही.
त्यांनी कारखाना उभा केला, आम्हाला आदर आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला कौतुक आहे. पण जसं यांना माहितीये, चार दिवस सासूचे असतात, त्याप्रमाणे चार दिवस सुनेचे यायचे की नाही.” असे सांगत अजित पवार यांनी नानासाहेब नवले यांना जाहीररित्या निवृत्तीचा सल्ला दिला.
कारखाना हे निव्वळ निमित्त…
आपल्या काकांना निवृत्तीचा सल्ला देणारे अजित पवार यांनी नानासाहेब नवलेंना निवृत्तीचा सल्ला दिला, यात विशेष काही नाही. परंतु, मावळ विधानसभेतील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, अजित पवार यांनी हे वक्तव्य बापूसाहेब भेगडे यांना जवळ करण्यासाठी केल्याचे बोलले जात आहे.
सभेला बापूसाहेब भेगडे गैरहजर
राष्ट्रवादीचे जुणे नेते, तथा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे हे अजित पवारांच्या कान्हेतील सभेला गैरहजर होते. बापूसाहेब भेगडे हे यंदा आमदारकीसाठी इच्छुक असून तशी इच्छा त्यांनी पक्षाकडे बोलून दाखविली आहे.
बापूंना तिकीट मिळावं असं मानणारा एक मोठा वर्गही बापूसाहेबांच्या पाठीशी आहे. परंतु अजित पवारांच्या खास मर्जीतील आमदार सुनील शेळके हेच मावळ विधानसभेचे पक्षाचे उमेदवार असतील अशी खात्रीशीर चर्चा मावळात सुरू आहे. याचा अर्थ बापूसाहेबांचा उमेदवारीचा पत्ता कट होइल, अशी चिन्हे दिसत आहेत.
दादांकडून बापूसाहेबांना जवळ करण्याचा प्रयत्न
आपल्या बंडात सोबत राहिलेले सुनील शेळके हे अजित पवारांचे विश्वासू आमदार आहेत. ते दुसऱ्यांदा निवडून येतील, असा विश्वास अजित पवारांना आहे. परंतु बापूसाहेब भेगडे सोबत असल्यास विजयाचा मार्ग सोपा होइल.
त्यामुळे अजित पवारांकडून बापूंना जवळ करण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठीच बापूसाहेब उपाध्यक्ष असलेल्या संत तुकाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले यांना अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा सल्ला देत अजित पवारांनी नवीन राजकीय डाव टाकल्याची चर्चा सध्या मतदारसंघात आहे.
भेगडेंना जवळ केल्यास शेळकेंचा मार्ग सोपा
सुनील शेळके हे आमदारकीच्या दुसऱ्या टर्मसाठी इच्छूक असून त्यांची तशी तयारी सुरू आहे. परंतू शेळके यांच्या उमेदवारीला स्वपक्षातील बापूसाहेब भेगडे आणि महायुतीतील रवींद्र भेगडे, बाळा भेगडे यांचे आव्हान आहे.
महायुतीकडून सुनील शेळके यांना अधिकृच उमेदवारी जाहीर झाल्यास रवींद्र भेगडे, बाळा भेगडे हे थेट विरोध करण्याची शक्यता कमी आहे.
परंतु बापूसाहेबांना उमेदवारी जाहीर न झाल्यास, ते वेगळा विचार करतील, अशी चर्चा आहे. परंतु, बापूसाहेब भेगडे पक्षासोबत अर्थात शेळकेंसोबत राहिल्यास सुनील शेळके यांचा दुसऱ्या टर्मचा मार्ग अधिक सोपा होइल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.





