Pune District: काकांना विचारात घ्यावं लागतं; त्याशिवाय पुढे चालत नाही

बारामती : काकांना विचारात घ्यावं लागतं. त्याशिवाय पुढे चालत नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले. बारामती तालुक्यातील एका रस्त्याच्या कामाबाबत टिप्पणी करताना त्यांनी काकांचा उल्लेख केला. त्यांनी नेमक्या कोणत्या काकांबद्दल वक्तव्य केले, हे स्पष्ट होत नसलं तरी त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.
त्यांच्या वक्तव्याचे विविध अर्थ काढले जात आहे. त्यामुळे तर्क- वितर्काना उधाण आले आहे.
अजित पवार हे बारामती तालुक्यातील बोरकरवाडी येथे जलपूजन कार्यक्रमासाठी आले होते. जनाई योजनेचे पाणी बंद पाइपलाइनद्वारे बोरकरवाडी तलावात सोडले. त्यांच्या हस्ते जलपूजन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
बारामती तालुक्यातील एका रस्त्याच्या कामाबाबत टिप्पणी करताना त्यांनी काकांचा उल्लेख केला आहे. दरम्यान, काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि शरद पवार यांच्यात जवळीक वाढत असल्याच्या चर्चा आहेत. शनिवारी (दि.१२) अजित पवार आणि शरद पवार यांच्यात साताऱ्यात बंद दाराआड बैठक झाली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. यावेळी दोघांच्या खुर्च्या एकमेकांना खेटून होत्या. ही घटना ताजी असताना आता अजित पवारांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. ज्यावरून विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवारांसह अनेकांनी विकास केला
अजित पवार म्हणाले, शरद पवार यांच्यासह अनेकांनी त्यांच्या काळात विकास करण्याचा प्रयत्न केला. पाण्याशिवाय काहीही होऊ शकत नाही, यासाठी आम्ही जनाई शिरसाई योजना केली. 1991 साली पिंपरी चिंचवडची लोकसंख्या 6 लाख होती, 2041 मध्ये ती 61 लाख होईल, योजना करणं आमचं काम आहे. परंतु, त्याचा मेंटेनन्स करणं हे तुमचं काम आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे, असेही पवारांनी ग्रामस्थांना आवर्जून सांगितले.





