अजित पवारांची दिल्लीच्या राजकारणात एंट्री; एनडीएच्या बैठकीला लावणार हजेरी

मुंबई- “एनडीएची 18 जुलैला दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्षांच्या आघाडीसाठी प्रयत्न सुरु असताना आता भाजपने देखील तयारी सुरू केली आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या बैठकीच्या माध्यमातून दिल्लीच्या राजकारणात एंट्री होणार आहे. गेली अनेक वर्षे शरद पवारांनी दिल्लीच्या राजकारणात आपले एक वेगळे वलय निर्माण केले आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार या बैठकीच्या माध्यमातून दिल्लीच्या राजकारणात स्वत:ची छबी निर्माण करण्याची तयारी करणार असल्याचे दिसून येत आहे.
भाजपने 18 जुलै रोजी बोलवलेल्या या बैठकीला भाजपचे काही जुने मित्र पक्ष उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच, गेल्या काही दिवसात भाजपपासून फारकत घेतलेले अकाली दलचे सुखबीर सिंग बादल, टीडीपीचे चंद्राबाबू नायडू सुद्धा पुन्हा एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. तसेच लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवानही या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.





