Ajit Pawar : हिंदी भाषा सक्तीविरोधात ठाकरे बंधूंच्या एकत्रित मोर्चावर अजित पवारांच मोठं विधान

Ajit Pawar : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात हिंदी भाषा सक्तीविरोधातील निर्यणाला राज्यभरातून कडाडून विरोध करण्यात येत आहे. या मुद्यावर उबाठा आणि मनसे एकत्र आली असून, ५ जुलैला गिरगावात एकत्रित मोर्चा निघणार आहे. या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने अवघ्या महाराष्ट्राचे या मोर्चाकडे लक्ष लागलेले आहे.
या मोर्चाला सर्व क्षेत्रातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे. या निर्णयावर ठाकरे बंधूनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अशातच आता ठाकरे बंधूंच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात मोठं विधान केले आहे.
हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चाची वेळच येऊ नये, असा आमचा प्रयत्न असल्याचे मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तर चर्चेतून चांगला मार्ग निघू शकतो, असेदेखील अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे आता महायुती सरकारडून ठाकरे बंधूंच्या मोर्चापूर्वीच हिंदी भाषेसंदर्भात काही निर्णय घेतला जाणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
जो मराठीमध्ये लिहायला, वाचायला शिकतो त्याला हिंदी सुद्धा लिहिता वाचता येतं. मराठी शिकलं की हिंदी पण येतं, लिपी तीच आहे. विद्यार्थी पाचवीपासून पण हिंदी शिकू शकतो, असे मत व्यक्त करत अजित पवार यांनी व्यक्त करत आपली भूमिका मांडली.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
मराठी ही आपली मातृभाषा आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सुद्धा आपण मराठी अनिवार्य केली आहे. आता दुसऱ्या मुद्द्यावरून वेगवेगळे मतप्रवाह आहेत, प्रत्येक जण आपली भूमिका मांडत आहे. पहिलीमध्ये शिकणाऱ्यांना इंग्रजी आणि मराठी शिक्षण द्यावे आणि पाचवीपासून हिंदी सुरू करावी, असे अजित पवार म्हणाले. तसेच जो मराठीमध्ये लिहायला, वाचायला शिकतो त्याला हिंदी सुद्धा लिहिता वाचता येतं. मराठी शिकलं की हिंदी पण येतं, लिपी तीच आहे. विद्यार्थी पाचवीपासून पण हिंदी शिकू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
हिंदी विरुद्ध मराठी वाद
गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज्यभरातून तीव्र विरोध होताना दिसत आहे. यामुळे आता हिंदी विरुद्ध मराठी असा वाद उफाळून आला आहे. अशातच या निर्णयाविरोधात ठाकेर बंधू एकत्रित मोर्चा काढणार असल्याने महायुती सरकारची गोची झाली आहे. त्यामुळे भाजपकडून पडद्याआड या मोर्चासाठी रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : “जे अंगावर येथील त्यांना शिंगावर घेऊ, मात्र….”; शिवसेनेच्या आमदाराचा भाजप आमदाराला थेट इशारा





