Ajit Pawar : मांडीला मांडी लावता आणि गद्दारी करता; अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर आयोजित आभार मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी गद्दारी केल्याचा गंभीर आरोप केला. “मांडीला मांडी लावून बसता आणि गद्दारी करता,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांची कानउघडणी केली. “भर सभेत कोणाचा पंचनामा करणार नाही, पण एकेकाला बोलावून फैलावर घेतो,” असे म्हणत त्यांनी आपला राग व्यक्त केला.
निवडणुकीत अजित पवार ‘ब’ प्रवर्गातून उमेदवार होते आणि त्यांना 91 मते मिळाली. त्यांनी सांगितले की, आपल्या विचारसरणीची 86 मते हक्काची होती, परंतु विरोधकांनीही मतदान केल्याने त्यांना 91 मते मिळाली. “हक्काची 86 मते मला मिळाली, तेवढीच मते आपल्या इतर उमेदवारांना मिळायला हवी होती, पण तसे झाले नाही. आपल्याच काही पदाधिकाऱ्यांनी गद्दारी केली,” असे पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
त्यांनी पुढे नमूद केले की, मतमोजणीच्या वेळी काही उमेदवारच उपस्थित नव्हते, तर विरोधकांपैकी काहीजण आणि इतर मंडळी आपल्या संपर्कात होती आणि मदत करत होती. “सर्वजण जीवाचे रान करून काम करत होते, पण आपलेच उमेदवार मतमोजणीला हजर नव्हते. असा हलगर्जीपणा चालणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
माळेगाव येथील या मेळाव्यात अजित पवार यांनी विजयासाठी सर्वांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले, परंतु चुका झालेल्या ठिकाणी बोट ठेवत कार्यकर्त्यांना खडसावले. “बाहेरील विरोधकांपेक्षा आपल्याच काही गद्दारांपासून धोका आहे,” असे ते म्हणाले.





