Ajit Pawar : शब्द अपुरे, डोळे ओले… मावळचा आधारस्तंभ कोसळला! आमदार सुनील शेळके दादांच्या आठवणींनी झाले भावूक
Ajit Pawar : हो तर हो, नाही तर नाही! अजितदादांच्या परखड स्वभावाचा मदन बाफनांनी उलगडला पैलू; प्रशासनावरील पकड आणि 'रोखठोक' नेतृत्वावर शोक.

Ajit Pawar – काही दुःखं अशीही असतात, ज्यांसाठी शब्द अपुरे पडतात. मन सुन्न होतं, डोळे भरून येतात आणि आवाज गहिवरतो. आज मावळसह संपूर्ण महाराष्ट्राची अवस्था अशीच झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे जाणे हे केवळ एका नेत्याचं नाही, तर हजारो कार्यकर्त्यांच्या आधारस्तंभाचं हरपणं आहे, अशा भावना सर्वत्र व्यक्त होत आहेत.
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि विकासाच्या प्रवासात एक युग संपल्याची जाणीव आज प्रत्येकाच्या मनाला चटका लावत आहे. निर्णयक्षमता, कार्यतत्परता आणि सामान्य माणसाशी असलेली आपुलकी यांचा अद्वितीय संगम असलेलं नेतृत्व अचानक हरपल्याची जाणीव संपूर्ण राज्याला स्तब्ध करून टाकणारी आहे. अजित पवार यांचं जाणं अजूनही मनाला स्वीकारता येत नाही, अशा शब्दांत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
दादा आता आपल्यात नाहीत, हे शब्द उच्चारायलाही जड वाटतंय. मन मानायला तयार नाही, डोळे उघडे असूनही सगळं एका वाईट स्वप्नासारखं वाटतंय, दादांच्या विमानाबाबतची बातमी कळताच काही क्षणांतच मनात अक्षरशः धस्स झालं, त्या क्षणांचं वर्णन करताना शेळके भावूक झाले. काहीतरी वाईट घडलंय, ही जाणीव पहिल्याच क्षणी झाली होती.
पण इतकं मोठं दुःख आपल्या वाट्याला येईल, याची कल्पनाही नव्हती. काही क्षणांत सगळंच संपल्याची बातमी आली आणि सगळंच बदलून गेलं, मावळच्या विकासासाठी अजितदादांनी दिलेलं योगदान शब्दांत मोजता येणार नाही, असेही आमदार शेळके म्हणाले.
घनिष्ठ संबंधांची साक्ष देणाऱ्या आठवणी
गेल्या सहा-सात वर्षांतील सहवासातील प्रत्येक क्षण आज डोळ्यांसमोर उभा राहतो आहे. एकेक प्रसंग आठवतो आणि दादा समोर उभे राहतात. जाहीर सभांमध्ये मला उद्देशून केलेली मिश्किल टिप्पणी आणि कामाबद्दलची पाठीवरची थाप, हे सगळं आज आठवतंय आणि मन अधिकच भरून येतंय, असे सांगताना शेळकेंनी आठवणींचा पूर मोकळा केला.
मावळातील जनतेवर असलेलं दादांचं विशेष प्रेम त्यांनी केवळ शब्दांत नाही तर कृतीतून दाखवून दिलं. कुठल्याही गावात, कुठल्याही कार्यकर्त्याच्या कार्यक्रमात ते मनमोकळेपणाने सहभागी होत असत. दादांकडे गेलं की कधीच परकेपणाची जाणीव झाली नाही. ते नेहमीच आपल्यातले वाटले, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
न भरून येणारी पोकळी – गणेश खांडगे
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी भावूक शब्दांत आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, नि:शब्द, मन सुन्न आहे, डोळे भरून आले आहेत. आमचे नेते अजित पवार यांचे जाणे आमच्यासाठी अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे. मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सिंहाचा वाटा होता. सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी ते नेहमी ठामपणे उभे राहत.
त्यांचे नेतृत्व आणि आत्मविश्वास आम्हा कार्यकर्त्यांना दिशा देणारे होते. आज त्यांच्या जाण्याने केवळ एक नेता नाही, तर आमचा आधार हरपला आहे. मनात खोलवर न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. भावनाही व्यक्त करता येत नसल्याचे खांडगे यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या राजकारणातील सळसळतं व्यक्तिमत्त्व हरपलं
ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मदन बाफना यांनीही आपल्या भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना दादांच्या नेतृत्वाचा वेगळाच पैलू उलगडला. दादा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातलं सळसळतं व्यक्तिमत्त्व होतं. ते असतील तरच खरं राजकारण वाटायचं. प्रतिक्रियांची भीती न बाळगता, जे मनात आहे ते स्पष्ट बोलायचे. स्पष्टवक्तेपणा आणि परखडपणा हाच त्यांचा स्वभाव होता, असे सांगत गेल्या चाळीस वर्षांच्या सहवासातील आठवणी सांगताना बाफना भावूक झाले.
माझे आणि त्यांचे चाळीस वर्षांपासूनचे संबंध होते. अनेक वेळा मी साहेबांनाही ठामपणे सांगायचो की, दादांचा निर्णय अगदी योग्य आहे आणि त्यानुसारच आपण काम केलं पाहिजे. समोरच्याला आशेवर अडकवून ठेवण्यापेक्षा, होत असेल तर सरळ होकार द्यायचा आणि नसेल तर नकार देऊन मोकळं करायचं, हा गुण त्यांच्याकडून शिकण्यासारखा होता, असेही ते म्हणाले.
विकासाचा वारसा कायम जिवंत
आज दादा शरीराने आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेली दिशा, त्यांनी निर्माण केलेला विकासाचा वारसा आणि त्यांनी घडवलेली माणसं कायम जिवंत राहतील, अशी भावना कार्यकर्त्यांपासून ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सर्वत्र व्यक्त केली जात आहे. मावळ तालुक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामान्य नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. मन सुन्न आणि डोळे भरले आहेत. प्रत्येकाच्या मनात एकच भावना दाटून आली आहे, असा नेता पुन्हा होणं नाही…






