Ajit Pawar : महायुतीत असूनही ‘स्वतंत्र’ निवडणूक लढवणार – अजित पवारांचं विधान चर्चेत

प्रभात वृत्तसेवा
पुणे – आपण महाविकास आघाडीत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढत होतो आणि गरज पडल्यावर एकत्र येत होतो. आता महायुतीत आहोत. आताही तशी वेळ येऊ शकते. सगळ्यांना आपला पक्ष आपली संघटना वाढविण्याचा अधिकार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावरून पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वंतत्रपणे लढण्याचे संकेतच दिले आहेत.
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष मुरलीधर निंबाळकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार शंकर मांडेकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार सुनील टिंगरे, प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य म्हणून कामाची संधी मिळाली पाहिजे, तरच कार्यकर्ते तयार होतात. जिंकून येणाऱ्याची क्षमता पाहून तिकीट दिले जाणार आहे. वरवर काम करू नका. मी सकाळी सहा वाजल्यापासून काम करतो. माझ्याएवढे नको; पण किमान निम्मेतरी काम करा, असा सल्लाही पवार यांनी दिला.
पांघरून घालायला शरद पवार नाहीत..
मागचा आणि आत्ताचा अजित पवार यामध्ये मोठा फरक आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी माझ्याकडे यायला संकोच करू नका. आपण आधी काही केलं, तर पांघरून घालायला शरद पवार असायचे. आता आपल्यालाच पांघरून घालायचे आहे, असेही पवार यांनी सांगितले.




