Ajit Pawar : “थोरला भाऊ हरपला!” भरत शहा अजितदादांच्या आठवणीने भावूक; शहा कुटुंबीयांनी सांगितला तो खास प्रसंग
Ajit Pawar : इंदापूर शहराचा आधुनिक चेहरामोहरा बदलण्याचे अजितदादांचे स्वप्न; नगराध्यक्षांनी व्यक्त केली खंत.

Ajit Pawar – अबालवृद्धांना आपलेसे वाटणारे,विकासाची दूरदृष्टी असलेले आणि माणुसकी जपणारे नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्याने एक अनुभवी व कार्यक्षम नेता गमावला असून, इंदापूर शहर व तालुक्याने आपला खरा विकासमार्गदर्शक हरपला आहे, अशी भावना इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा यांनी व्यक्त केली.
अजितदादांच्या राजकीय वाटचालीची सुरुवात छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून झाली. संघर्ष, कष्ट आणि सातत्याच्या जोरावर त्यांनी यशाच्या पायर्या चढत उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली; मात्र या प्रवासाची जाणीव त्यांनी कधीही विसरली नाही. त्यामुळेच बारामतीच्या बरोबरीने इंदापूर शहर व तालुक्याचाही सर्वांगीण विकास व्हावा, हे त्यांचे स्पष्ट स्वप्न होते. इंदापूर तालुक्याला सक्षम राजकीय नेतृत्व आणि बळ मिळावे, यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले.
शहर व तालुक्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देताना त्यांनी कधीही हात आखडता घेतला नाही. बारामतीत जे आहे, ते इंदापूरमध्येही असावे, हा त्यांचा आग्रह होता. त्याच भूमिकेतून त्यांनी इंदापूरमध्ये विद्या प्रतिष्ठानची शाखा आणली.इंदापूर व्यापारी संघटनेचे पत्र प्राप्त झाल्याच दिवशी उजनी पाणलोट क्षेत्रात पूल बांधण्यासाठी निधी जाहीर करणे,
तसेच अल्पावधीतच कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करणे, हे कार्य केवळ अजितदादांसारख्या संवेदनशील व निर्णयक्षम नेतृत्वालाच शक्य होते,असे नगराध्यक्ष भरत शहा यांनी सांगितले.स्वच्छता अभियानातील पारितोषिक त्यांच्या हस्ते स्वीकारताना मनात जी भावना निर्माण झाली, ती शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजहित जपणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख कायम राहील, असेही त्यांनी नमूद केले.
आमचे वंदनीय गोकुळदास भाई गेल्यानंतर अजितदादांनी आमच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.त्या भेटीत राजकीय नेता म्हणून नव्हे, तर थोरला भाऊ म्हणून त्यांनी आमच्या दुःखात सहभाग घेतला.त्या अनुभवाने आम्ही शहा कुटुंबीय भारावून गेलो होतो, असेही नगराध्यक्ष भरत शहा यांनी सांगितले.
मागील महिन्यात झालेल्या इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निर्विवाद सत्ता मिळाली. नगरपरिषदेवर सत्ता आल्यानंतर शहराचा नियोजित, आधुनिक आणि लोकाभिमुख विकास करण्याचा त्यांचा सविस्तर आराखडा होता. त्या अनुषंगाने त्यांनी माझ्याशी व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी चर्चा केली होती.
अजितदादांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार इंदापूर नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत; मात्र हा विकास प्रत्यक्ष पाहण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आणि सूचना देण्यासाठी अजितदादा शरीराने आमच्यासोबत नसतील, ही खंत आयुष्यभर मनात राहणार आहे, असे भावनिक शब्दांत भरत शहा यांनी श्रद्धांजली अर्पण केली.






