प्रभात वृत्तसेवा इंदापूर – इंदापूर तालुक्यात नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या धामधुमीला उधाण आले असून, संपूर्ण तालुक्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक पूर्वतयारीसाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने गुंतल्यामुळे पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि नगरपरिषदेतील बहुतांश नियमित कामकाजावर परिणाम झाला आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून, अनेकांना आता निवडणूक संपेपर्यंत म्हणजेच २ डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या दोन्हीही कार्यालयांत अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने शुकशुकाट दिसत आहे. २ डिसेंबर रोजी इंदापूर नगरपरिषदेची निवडणूक पार पडणार असल्याने, मतदान यादी, मतदान केंद्र तपासणी, प्रशिक्षण, मतदान साहित्याची तयारी आदी कामांसाठी पंचायत समिती, महसूल विभाग आणि नगरपरिषद यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी यांची ड्युटी लावण्यात आली आहे.यामुळे पंचायत समितीचे कृषी, आरोग्य, शिक्षण संबंधित कामे, महसूल विभागातील ७/१२, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नामांतरे आणि नगरपरिषदेमधील दैनंदिन अर्ज व सेवा केंद्राची कामे जवळपास ठप्प झाली आहेत. लाभार्थी बघत आहेत वाट महसूल आणि पंचायत समितीकडून लाभ मिळवणारे शेतकरी आणि नागरिकही परिस्थिती ओळखून निवडणूक होईपर्यंत प्रतीक्षा करत आहेत. “निवडणुका झाल्याशिवाय फाईल हलत नाही,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. अधिकारी कार्यालयात नसल्याने कामे गतीने सुरू होण्यासाठी २ डिसेंबरची वाट पाहतो आहोत, असे काही शेतकऱ्यांनी सांगितले. राजकीय वातावरण तापले इंदापूर नगर परिषदेची १७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने, राजकीय हालचालींना गती आली आहे. नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी कोण अर्ज दाखल करणार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. गटबाजी आणि उमेदवारांची धावपळ यामुळे तालुक्यात राजकीय चर्चांना जोर आला असून, अर्ज मागे घेण्याची तारीख संपताच प्रचाराचे रणांगण खुलणार आहे. निवडणुकीनंतरच प्रशासनाला गती मतदान प्रक्रियेनंतरही प्रशासकीय यंत्रणेला परिणामकारक कामकाजासाठी काही दिवस लागतात. त्यामुळे बहुतांश नागरिकांना प्रलंबित कामांसाठी निवडणूक झाल्यानंतरच कार्यालयात यावे लागेल, अशी अपेक्षा आहे. शासकीय यंत्रणा निवडणूककेंद्रित झाल्याने सामान्यांचे कामकाज या काळात दुर्लक्षित राहणे अपरिहार्य ठरले आहे.