व्हिडीओ – उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ‘असा’ सोडवला खेड पंचायत समितीचा प्रश्न
राजगुरूनगर (रामचंद्र सोनवणे) : “पंचायत समितीच्या जागेत पंचायत समितीची प्रशासकीय इमारत बांधावी व पुढील जागेत तालुक्यातील विविध कार्यालये एकत्र असणा-या सचिवालयाची इमारत बांधा याबरोबरच या कामाचे इस्टिमेट ४ ते ५ आर्किटेककडे पाठवा ज्याचे योग्य असेल त्याला हे काम द्या.” असा आदेश बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
खेड पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी ५ कोटी निधी भाजप सेना सरकारने मंजूर केला होता. मात्र हि इमारत कोणत्या जागेत बांधायची यासाठी आजी-माजी आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु आहे. खेड पंचायत समितीच्या पुढील जागेत पंचायत समितीची प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार होती. त्याचे भूमिपूजनही झाले होते मात्र सरकार बदलले. तालुक्यातही शिवसेनेचे आमदार गोरे पायउतार झाले तर माजी आमदार दिलीप मोहिते पुन्हा निवडून आले. यानंतर पंचायत समितीच्या इमारतीसाठी हि जागा योग्य नसल्याचे सांगत त्यांनी या जागेत सर्व कार्यालये असलेले सचिवालय बांधावे व पंचायत समिती असलेल्या जागेतच पंचायत समितीची प्रशासकीय इमारत बांधावी असा आग्रह धरल्याने हे काम रखडले होते.
सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यामुळे श्रेयवादाची लढाई सुरु झाली असल्याचं बोललं जात होतं. अशातच उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज येथील पंचायत समितीला भेट देऊन जुन्या इमारतीची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांना त्यांनी इमारतीबाबत आदेश दिले.
यावेळी खेड तहसीलदार कार्यालयाच्या जुन्या इमारतीची देखील पाहणी करून त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी यावेळी पंचायत समितीची आहे ती जागा पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीसाठी कशी योग्य आहे व त्यासमोरील जागेत सर्व शासकीय कार्यलये एकत्र आणून तालुक्यातील नागरिकांना कसे सोयीस्कर होणार आहे याबाबत माहिती दिली.
पंचायत समितीची १९६५ साली बांधलेल्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. याबरोबरच तहसीलदार कार्यालयात व प्रांत अधिकारी कार्यालय जुने जीर्ण होऊन मोडकळीस आले आहे. शिवाय जिल्हा सत्र न्यायालयाचा विस्तार होणार असल्याने त्यांना इमारत नाही. सध्या असलेल्या ठिकाणी तहसीलदार कार्यालयाची जागा न्यायालयाला दिल्यास व तहसीलदार कार्यालय पंचायत समितीच्या पुढे सचिवालयात आणल्यास गैरसोय दूर होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, गटविकास अधिकारी अजय जोशी यांच्यासह बांधकाम विभागाचे जिल्हा परिषदेचे अधिकारी, राष्टवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अजित पवार यांनी पंचायत समितीची पाहणी करून पंचायत समितीपुढील एक एकर जागेत सर्व कार्यालये एकत्र असणारी इमारत करावी त्यासाठी निधी उपलब्ध करू. आहे त्या जागेवर पंचायत समितीची प्रशासकीय इमारत बांधावी. ग्रामविकास खात्याकडे तात्काळ प्रस्ताव पाठवा दोन्ही साठी भरीव निधीची तरतूद केली जाईल.
एकूणच गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या पंचायत समितीच्या प्रशससकीय इमारतीचे काम मार्गी लागणार असून आज अजितदादा पवार यांनी याबाबतचे अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यामुळे पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या श्रेयवादाची लढाई संपुष्ठात आली आहे तर नव्याने सर्व कार्यालये एकत्र आणणारी सचिवालयाची इमारत पंचायत समितीच्या पुढील जागेत होणार असल्याने तालुक्यातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.





