Rohit Pawar – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी सीआयडी कार्यालयास भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रोहित पवार यांनी तपास प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करत घातपाताची शक्यता असल्याचा दावा केला. दरम्यान, राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून तपास व्हावा, अशीही मागणी त्यांनी केली. पवार म्हणाले, की आम्ही सीआयडी कार्यालयात आलो, तेव्हा आमच्या गाडीसह अनेक पदाधिकाऱ्यांना आत येण्याची परवानगी देण्यात आली नाही. विनंतीनंतर काहींना प्रवेश देण्यात आला. एडीजींना आम्ही आमच्याकडील माहिती, तसेच डीजीसीएच्या अहवालातील त्रुटींबाबत माहिती दिली. सीआयडीकडून सांगण्यात आले, की विमान अपघाताचा अंतिम अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल केला जाईल. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१९ मधील विमान अपघाताबाबत गुन्हा दाखल केल्याचा उल्लेख करत, दादा लोकनेते असूनही त्यांच्या प्रकरणात गुन्हा दाखल होत नाही. यात काही काळेबेरे असल्याची शंका येते. पवार म्हणाले, की सीआयडीला व्ही. के. सिंग आणि संबंधित संस्थांना वाचवायचे आहे. सीआयडी कार्यालयात सिंग यांना सुरक्षा दिली, तर पत्रकार आणि आमच्या लोकांना प्रवेश नाकारला. उद्या दिल्लीला जाऊन अरविंद केजरीवाल आणि इंडिया आघाडीतील इतर नेत्यांची भेट घेणार आहे. अपघाताची सखोल तपास व्हावा, यासाठी आम्ही लढा सुरू ठेवणार आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता असल्याची माहितीही पवार यांनी दिली.