Ajit Pawar Plane Crash : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (Directorate General of Civil Aviation) VSR एव्हिएशन कंपनीच्या लेअरजेट विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. DGCAने जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, कंपनीच्या विमानांमध्ये तांत्रिक त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली. विशेषतः VSRच्या चार लेअरजेट विमानांचे उड्डाण तात्काळ स्थगित करण्यात आले असून पुढील आदेश येईपर्यंत ती विमानं सेवा देऊ शकणार नाहीत. अपघातानंतर वाढला दबाव बारामती येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत होती. आमदार रोहित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांनी VSR कंपनीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर DGCAने प्राथमिक चौकशी सुरू केली होती. चौकशीत काही गंभीर तांत्रिक बाबी समोर आल्याने अखेर उड्डाणबंदीचा निर्णय घेण्यात आला. लेअरजेट 40, 45 मालिकेवरही बंदी मिळालेल्या माहितीनुसार, लेअरजेट 40, 45 आणि संबंधित आरएस/आरटी मालिकेतील विमानांवर उड्डाणबंदी लागू करण्यात आली आहे. विमानांच्या देखभालीत त्रुटी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. देशभरातील विमान कंपन्यांचे ऑडिट अपघातानंतर केवळ VSR नव्हे, तर इतर काही खासगी विमान कंपन्यांचेही ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचाच भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. DGCAचा हा निर्णय विमान सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असून, पुढील तपासानंतरच कंपनीला पुन्हा उड्डाणाची परवानगी दिली जाणार आहे.