अजितदादा: करारी मुखवट्याआडचा एक हळवा माणूस!

अजित अनंतराव पवार… हे नाव समोर आले की डोळ्यांसमोर उभी राहते ती एक कडक शिस्तीची, करारी आवाजाची आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेली एक आक्रमक मूर्ती. कुशल प्रशासक म्हणून प्रसिद्ध असलेल्या या नेत्याचा वक्तशीरपणा तर अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला आहे. सकाळी ६ वाजता फाइलवर सही करणारा किंवा कामाच्या साइटवर हजर राहणारा हा नेता प्रशासनासाठी एक धाक होता. पण, या कडक आणि आक्रमक मुखवट्यामागे एक अत्यंत मृदू, भावूक आणि कौटुंबिक मूल्यांना जपणारा माणूसही दडलेला होता, यावर अनेकांचा चटकन विश्वास बसणार नाही. कारण, दादांनी आपल्यातील या हळव्या नेत्याचा आणि माणसाचा कधीच शो ऑफ केला नाही.
अजितदादांचे राजकारण हे रोखठोक होते. जे मनात तेच ओठांवर. कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्याची भरसभेत कानउघाडणी करणारे दादा जितके आक्रमक वाटायचे, तितकेच ते आतून अत्यंत मृदू आणि संवेदनशील होते. त्यांच्याकडे मदतीसाठी आलेल्या सामान्य माणसाच्या डोळ्यांतील अश्रू त्यांना कधीच पाहवत नसत. जाहीर सभांमध्ये आणि कॅमेऱ्यासमोर कठोर दिसणारे दादा, पडद्यामागे मात्र कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात अगदी सहजपणे सामील व्हायचे. त्यांना दिलासा द्यायचे, उभारी द्यायचे.
केवळ कार्यकर्तेच नाही तर परिस्थितीने गांजलेला आणि मदतीची आस घेऊन सरकार दरबारी पोहोचलेला सर्वसामान्य माणूस कधीच अजित पवार यांच्या दारातून रित्या हाताने परतला नाही. राजकारणात अनेकदा शब्द फिरवण्याच्या आणि फसवणुकीच्या खेळ्या खेळल्या जातात, पण दादा याला अपवाद होते. ते कट्टर राजकारणी नक्कीच होते, पण त्यांनी तत्त्वांचा सौदा कधी केला नाही.
दिलेल्या शब्दाला जागणारा हा नेता होता. गोड बोलून कोणाची फसवणूक त्यांनी कधीच केली नाही. राजकारणात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न आपण कायमच पाहत आलो आहे. त्या प्रश्नांवर अनेक निवडणुका लढल्या आणि जिंकल्याही जातात.
मतदारांनाही त्यांच्या त्याच प्रश्नांवर ही नवी निवडणूक आली आहे याचे विस्मरण होते व त्यामुळे नेते मंडळींचे आणि त्यांच्या पक्षांचेही फावते. अजितदादांचा शिरस्ता वेगळा होता. ते भूलथापा देत नव्हते. जाहीर केलेली कामे आणि दिलेला शब्द त्यांनी कायम पाळला.
सार्वजनिक जीवनात कितीही व्यग्र असले, तरी दादांनी कुटुंबालाही नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले. नाती जपण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नव्हते. विशेषतः त्यांच्या मातृप्रेमाच्या कथा तर राजकारणाच्या पलीकडच्या आहेत. आईवर त्यांची विशेष माया होती. कितीही मोठे राजकीय संकट असो वा कामाचा अथांग व्याप, आईच्या एका शब्दापुढे दादा नेहमीच नतमस्तक असायचे.
केवळ आईच नव्हे, तर त्यांच्या बहिणींनीही काही मुलाखतींमध्ये दादांच्या मनाचा हळवेपणा आणि भावूकता बोलून दाखवली आहे. त्याचवेळी त्यांचा वक्तशीरपणा आणि त्यांचा सतत नीटनेटकेपणासाठी असणारा आग्रह याबाबतही त्यांनी सांगितले आहे.
बाहेरच्या जगासाठी तापट किंवा ज्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती वाटावी असे असलेले दादा घरात मात्र एक अत्यंत काळजीवाहू भाऊ, मुलगा आणि वडील होते. कुटुंबातील प्रत्येकाच्या छोट्या-छोट्या आनंदाची काळजी ते अगदी मनापासून घ्यायचे.
अजितदादांचे संबंध केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते. उद्योग, कला, साहित्य आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांतील दिग्गजांशी त्यांचे जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक मैत्र होते. अनेक मोठ्या व्यक्तींशी त्यांची घट्ट मैत्री होती, पण राजकीय फायद्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी त्यांनी या मैत्रीचा कधीही वापर केला नाही, की त्याचा कधी शो ऑफ केला नाही.
मैत्री आणि नातेसंबंध एका बाजूला आणि न्याय दुसऱ्या बाजूला, ही त्यांची कामाची पद्धत होती. चुकीचे काम करणारी व्यक्ती कितीही जवळची असली, अगदी रक्ताचे नाते किंवा जवळचा मित्र असला, तरी दादांनी कधीही मुलाहिजा ठेवला नाही. काम चुकीचे आहे तर ते होणार नाही, हा त्यांचा बाणा जितका त्यांच्या विरोधकांना ठाऊक होता, तितकाच तो त्यांच्या जवळच्या लोकांनाही माहीत होता.
एक आदरयुक्त वारसा
अजितदादांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे वरून कडक पण आतून गोड असलेल्या नारळासारखे होते. त्यांचा वक्तशीरपणा आणि प्रशासकीय दरारा जितका चर्चिला गेला, तितकीच त्यांच्या मनाची श्रीमंती आणि नात्यांबद्दलची ओढ पडद्यामागे राहिली.
राजकारणाच्या गढूळ पाण्यातही त्यांनी आपल्यातील माणूस आणि तत्त्वनिष्ठता जिवंत ठेवली. एक कठोर प्रशासक म्हणून ते जेवढे लक्षात राहतील, तेवढेच नाती जपणारे, आईचे लाडके सुपुत्र आणि शब्दाला जागणारे एक हळवे दादा म्हणून महाराष्ट्राच्या मनावर कायमचे कोरले जातील.
– आनंद गांधी
व्यवस्थापकीय संचालक
दैनिक प्रभात.





