Ajit Pawar : ‘जोपर्यंत माझे हात पाय हलतायेत ना…’ दादांचं ते वाक्य खरचं ठरलं
पूर्ण महाराष्ट्रात लॉक डाऊन सारखी परिस्थिती निर्माण झाली असून, अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्र सुन्न झाला आहे.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांची अपघातात अशी अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. नवीन वर्षांच्या सुरुवातीच्या महिन्यातच या दुःखद बातमीने महाराष्ट्र हादरला आहे.
संपूर्ण बारामती सुन्न झाली असून मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी केली आहे. अनेक राजकीय मंडळींना अश्रु अनावर झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात लॉक डाऊन सारखी परिस्थिती निर्माण झाली असून, अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. आज संध्याकाळी बारामती मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं सांगितलं आहे.
अनेक ठिकाणी गावे, मार्केट यार्ड बाजारपेठा बंद असून शिक्षण संस्था आणि शाळा महाविद्यालय बंद आहेत. यासोबतच अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण बारामती बंद करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर घटना स्थळावरील काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असून, यामध्ये दादांच्या काही महत्वाच्या कागदपत्रांचे देखील फोटो असल्याचं दिसत आहे.
अजित दादा गेले…
देह थांबला, पण काम थांबले नाही.
माळरानावर उरलेली ती कागदे सांगत आहेत
ते शेवटच्या क्षणापर्यंत जबाबदारीपासून दूर गेले नाहीत.#AjitPawar #ajitpawarnews #pune #AjitPawarDeath #NCP #Baramati #planecrash pic.twitter.com/s56bnEO3th
— Pravin Doke (@pravindoke007) January 28, 2026
अजित पवार हे सकाळी-सकाळी आपल्या कामाची सुरुवात करत होते. आज देखील ते सकाळी नियोजीत सभेसाठी बारामतीसाठी निघाले होते. बारामती विमानतळावर विमान लॅडिंग करण्यापूर्वीच ते हेलकावे खात खाली कोसळले. सकाळी 8:30 वाजेच्या आसपास विमान कोसळल्याचे समजते.
द्रौपदी मूर्मू यांनी व्यक्त केलं दुःख
अजित पवार यांच्या निधनानंतर द्रौपदी मूर्मू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. अजित पवार यांचे अकाली निधन ही भरून न येणारी हानी आहे.
महाराष्ट्राच्या विकासात, विशेषतः सहकार क्षेत्रातील त्यांच्या मोलाच्या योगदानासाठी त्यांची नेहमी आठवण ठेवली जाईल. त्यांच्या कुटुंबीयांप्रती, समर्थकांप्रती आणि चाहत्यांप्रती मी मनापासून शोकसंवेदना व्यक्त करते. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या इतर सर्वांच्या कुटुंबीयांनाही हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो.
माझ्यासाठीही एक वैयक्तिक नुकसान आहे : अमित शहा
अजित पवार यांच्या निधनानंतर अमित शहा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, आज झालेल्या एका दुःखद दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि एनडीएतील आमचे ज्येष्ठ सहकारी अजित पवार जी यांना गमावल्याची बातमी ऐकून मन अत्यंत व्यथित झाले आहे.
गेल्या साडेतीन दशकांपासून अजित पवार जी यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी स्वतःला झोकून दिले, ते शब्दांत मांडणे कठीण आहे. ते जेव्हा केव्हा भेटायचे, तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताशी संबंधित अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करायचे.
त्यांचे निधन हे एनडीए कुटुंबासाठीच नव्हे, तर माझ्यासाठीही एक वैयक्तिक नुकसान आहे. पवार कुटुंबीयांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. शोकाच्या या कठीण प्रसंगी संपूर्ण एनडीए पवार कुटुंबासोबत ठामपणे उभे आहे. ॐ शांती शांती शांती.





