Ajit Pawar : आनंदाचा शिधा बंद? अजित पवारांचा खुलासा ; सगळ्या योजना कायम चालत नाहीत, बदल आवश्यक

प्रभात वृत्तसेवा
पुणे – काही योजना कायमच्याच चालतात अशातला भाग नाही. परिस्थितीनुसार काही बदल केले जातात. आनंदाचा शिधा ठराविक लोकांनाच मिळायचा; पण लाडक्या बहिणींचा पैसा हा माझ्या बहिणींना मिळतो. सगळ्या चांगल्या योजनांबाबत महायुती सरकार सकारात्मक आहे. अनेकदा काही योजनांचा लाभ योग्य ठिकाणी पोहोचत नसेल, तर त्यामध्ये काही बदल करावा लागतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता, पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी आनंदाचा शिधा योजना बंद झाल्याबाबत विचारले असता, पवार यांनी हे उत्तर दिले. ते म्हणाले, की अनेक योजना याआधीही आल्या. काही बंद केल्या. काही योजनांमध्ये बदल केले. काही आणखी लोकाभिमुख केल्या. त्या पद्धतीने या योजनेबद्दलही मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
कारवाईच्या सूचना..
गुंड नीलेश घायवळ प्रकरणाबाबत विचारले असता, उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की या प्रकरणात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा केली आहे. पोलिसांनी घायवळला बंदूक परवाना दिलेला नाही. कोण कुठल्या गटाचा, पक्षाचा कोणाच्या जवळचा किंवा लांबचा कार्यकर्ता आहे. कोणासोबत त्याचे छायाचित्र आहे किंवा नाही, हे न पाहता कारवाईच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. चूक असणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.




