अजित पवार गटाचे नेते सिद्धिविनायकाचरणी लीन; संजय राऊतांनी साधला निशाणा, ‘चोऱ्या लबाड्या करतंय….’

Ajit Pawar | Sanjay Raut | Siddhivinayak Mandir Darshan : राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठा धक्का सहन करावा लागला. तर महाविकास आघाडीने ३० जागा मिळत मोठे यश संपादन केले. यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी केली आहे.
त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि. ९ जुलै) मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील यांसह सर्व आमदार, महत्त्वाचे नेते मंडळी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, “आजचा दिवस चांगला होता. म्हणूनच आम्ही हा दिवस निवडला. मंगळवार गणरायाचा दिवस. दर्शनासाठी आम्ही सर्व आमदारांसह येथे पोहोचलो. आम्ही दर्शन घेतले. तसेच विधान परिषदे आणि विधानसभेच्या निमित्ताने आमचा पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रचाराची सुरुवात करत आहे.
आज मुंबईत श्री. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. सोबत सहकारी नेते, मंत्री, आमदार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी ही जनसेवा आमच्या हातून अशीच घडत राहो, यासाठी बाप्पाकडे साकडे घातले.
गणपती बाप्पा मोरया! pic.twitter.com/eZ6BOMW2Y6— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 9, 2024
आम्ही बाप्पाचे आशीर्वाद घेतले आहेत. बाप्पा नक्कीच आशीर्वाद देतील. आम्ही आता जनतेच्या समोर जाणार आहोत, त्यासाठी जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावे, हेच साकडं सिद्धिविनायकाला घातले.” असं अजित पवार यावेळी म्हणाले.
तर दुसरीकडे बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी संजय राऊत माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले की, “जे सिद्धिविनायकाचं दर्शन घेत आहेत. ती चांगली गोष्ट आहे. सिद्धिविनायकाला पाप पुण्य समजतं. पुण्य कोण करतंय आणि पाप कोण करतंय या सर्व गोष्टी समजतात. चोऱ्या लबाड्या कोण करतंय, कोण माझ्या दारात पुण्यात्म व्हायला येतेय,
हे देखील सिद्धिविनायकाला कळतं, ज्या प्रकारचं पाप एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलं आहे. सिद्धिविनायक अशाप्रकारे कोणालाही आशीर्वाद देत नाही.; अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी अजित पवारांवर केली.





